'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:01 IST2025-11-12T16:58:53+5:302025-11-12T17:01:13+5:30
दिल्लीतील या स्फोटाचा तपास सुरू असतानाच जैश-ए-मोहम्मदचे एक संशयास्पद पोस्टर सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सवर व्हायरल झाले आहे.

'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटाच्या तपासात आता एक नवा आणि अतिशय गंभीर ट्विस्ट आला आहे. या भीषण घटनेत १० निष्पाप लोकांचा बळी गेला, तर २० हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी नेटवर्ककडे संशयाची सुई वळली होती आणि त्यात धक्कादायकपणे काही वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. तपास यंत्रणा काम करत असतानाच, आता थेट दहशतवादी संघटनेचे एक धमकीचे पोस्टर समोर आले आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या आहेत.
जैशचे पोस्टर आले समोर
दिल्लीतील या स्फोटाचा तपास सुरू असतानाच जैश-ए-मोहम्मदचे एक संशयास्पद पोस्टर सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सवर व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये, धक्कादायकपणे राफेलच्या विमानांच्या फोटोंसह एक संदेश लिहिलेला आहे. हा संदेश भारतीय नागरिकांना इशारा देणारा आहे.
काय आहे पोस्टरमध्ये?
जैशने धमकी देताना म्हटले आहे की, "उम्मीद करता हूं आप सब लोग खैरियत से होंगे... जो कुछ हमने अब तक आप तक पहुंचाया है, आप उस पर अमल करोगे." दहशतवाद्यांनी पुढे अत्यंत धडकी भरवणारा इशारा दिला आहे की, "आम्ही पाहतो आहोत की तुम्ही अजूनही पापांमध्ये लिप्त आहात, त्यामुळे शरीयतच्या विरोधात काम करणे बंद करा, अन्यथा आमचा ॲक्शन निश्चित असेल." आणखी काही गोष्टींचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
श्रीनगरच्या नौशेराचा खास उल्लेख
आजतकच्या रिपोर्टनुसार, या संदेशात श्रीनगरमधील नौशेरा भागाचा खास उल्लेख करण्यात आला आहे. जैशने नौशेरा भागात राहणाऱ्या लोकांना थेट धमकी दिली आहे. जे लोक भारतीय सुरक्षा दलांना आपल्या दुकानांमध्ये जागा देतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची उघड धमकी यात देण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे पोस्टर नेमके कुठून आले आहे आणि कुठवर पसरले आहे, याचे स्रोत तपासण्याचे काम सुरक्षा एजन्सीज करत आहेत.

डॉक्टर मॉड्युलचे तुर्की कनेक्शन!
दिल्ली स्फोटाच्या तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. स्फोटाशी संबंधित असलेल्या 'डॉक्टर मॉड्यूल'मध्ये डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुजम्मिल यांची नावे समोर आली आहेत. तपासातील अधिकाऱ्यांच्या मते, या मॉड्युलचे थेट तुर्की कनेक्शन आहे. फरिदाबादमध्ये उमर आणि मुजम्मिलच्या काही सहकाऱ्यांना अटक झाली होती आणि त्यांच्याकडून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, या अटकेमुळे घाबरलेल्या डॉ. उमरने गडबडीत कार चुकीच्या पद्धतीने हाताळली, ज्यामुळे कारमधील स्फोटके फुटली आणि हा भीषण स्फोट झाला. तुर्की कनेक्शनमुळे आता या आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा अधिक सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.