ती मुलगी प्रचंड दबावाखाली, आमच्यावरही दबाव टाकला जातोय; साक्षी मलिक हिचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 18:10 IST2023-06-10T18:03:15+5:302023-06-10T18:10:44+5:30
सदर प्रकारावर साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी भाष्य केलं आहे.

ती मुलगी प्रचंड दबावाखाली, आमच्यावरही दबाव टाकला जातोय; साक्षी मलिक हिचा आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंनीब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. दरम्यान पैलवानांनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर या प्रकरणात नवीन वळण आले. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाणा आले आहे.
सदर प्रकारावर साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी भाष्य केलं आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या 7 महिला कुस्तीपटूंपैकी एका अल्पवयीन असून तिने दबावाखाली तिचे विधान बदलले आहे. त्या संबंधित मुलीने प्रचंड दबावाखाली हे विधान बदलले असल्याचं साक्षी मलिकने दावा केला आहे. तसेच आमच्यावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोपही साक्षी मलिक हिने केला आहे.
काय म्हणाले अल्पवयीन मुलीचे वडील?
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनीही त्यांच्या आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यातल्या कटुतेवर प्रतिक्रिया दिली. याची सुरुवात 2022 मध्ये लखनौ येथे झालेल्या आशियाई अंडर-17 चॅम्पियनशिपच्या चाचणीपासून झाली, ज्यामध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी भारतीय संघात प्रवेश करू शकली नाही. रेफ्रींच्या निर्णयासाठी त्यांनी ब्रिजभूषण यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, “मी सूडाच्या भावनेने भरून गेलो होतो, कारण माझ्या मुलीची एका वर्षाची मेहनत रेफरीच्या निर्णयामुळे वाया गेली. मी बदला घेण्याचे ठरवले आणि याच सूडाच्या भावनेने खोटी तक्रार दिली."
बैठकीनंतर पैलवान आणि सरकार काय म्हणाले?
आंदोलक कुस्तीपटूंसोबतची सहा तास चाललेली बैठक सकारात्मक असल्याचे सांगून क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सांगितले. ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी बैठकीनंतर सांगितले की, त्यांचे आंदोलन अद्याप संपलेले नाही, केवळ सरकारच्या विनंतीवरुन त्यांचे आंदोलन 15 जूनपर्यंत पुढे ढकलले आहे.