'दहशतवादी दोन प्रकारचे असतात'; लाल किल्ला स्फोटानंतर पी. चिदंबरम यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:17 IST2025-11-13T15:11:28+5:302025-11-13T15:17:44+5:30
दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरु झालीय.

'दहशतवादी दोन प्रकारचे असतात'; लाल किल्ला स्फोटानंतर पी. चिदंबरम यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात
P. Chidambaram on Delhi Red Fort Car Blast:दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटानंतर केंद्र सरकारने या घटनेला 'दहशतवादी हल्ला' म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी देशातील दहशतवादाच्या स्वरूपावर महत्त्वपूर्ण भाष्य करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी दहशतवादी केवळ सीमेपलीकडूनच येतात, ही धारणा खोटी ठरवत 'स्थानिक दहशतवादा'वर गंभीर चर्चा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु झालीय.
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपला मुद्दा मांडला. "पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी हाच मुद्दा उचलून धरला आहे की, दहशतवादी दोन प्रकारचे असतात. १. परदेशात प्रशिक्षित झालेले घुसखोर दहशतवादी. २. स्थानिक दहशतवादी," असं पी. चिदंबरम म्हणाले.
माझी थट्टा करण्यात आली!
माजी गृहमंत्र्यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, जेव्हा जेव्हा त्यांनी 'स्थानिक दहशतवादा'चा उल्लेख केला, तेव्हा त्यांची थट्टा करण्यात आली आणि त्यांना ट्रोल करण्यात आले. संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यानही त्यांनी हाच मुद्दा मांडला होता.
यावरुनच चिदंबरम यांनी थेट सरकारवरही निशाणा साधला. "मला हे स्पष्टपणे सांगावे लागेल की, सरकारने या विषयावर मौन बाळगले आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की स्थानिक दहशतवादी देखील अस्तित्वात आहेत. आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की, अशी कोणती परिस्थिती आहे, ज्यामुळे भारतीय नागरिक – अगदी सुशिक्षित लोकसुद्धा – दहशतवादी बनतात?" असा सवाल चिदंबरम यांनी केला. यावर आता देशात गंभीर विचारमंथन होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे, पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यापूर्वीच केंद्र सरकारने लाल किल्ला कार स्फोटाला 'दहशतवादी हल्ला' म्हणून स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी बैठकीनंतर १२ नोव्हेंबर रोजी केंद्रीय कॅबिनेटने एक प्रस्ताव पारित केला. यामध्ये लाल किल्ल्याजवळील कार स्फोटाद्वारे देशविरोधी शक्तींनी दहशतवादी घटना' घडवून आणल्याचे म्हटले आहे. सरकारने घटनेच्या चौकशीचे निर्देश दिले असून, दोषींची तातडीने ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.