बुलेटप्रूफ गाडी, SWAT कमांडो आणि त्रिस्तरीय सुरक्षा; दहशतवादी तहव्वूरला आणण्यासाठी कडक सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:41 IST2025-04-10T12:35:28+5:302025-04-10T12:41:49+5:30

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला दिल्लीत आणलं जाणार आहे.

Terrorist Tahawwur Rana will be brought from the airport to the NIA headquarters amid tight security Delhi Police SWAT team deployed for security | बुलेटप्रूफ गाडी, SWAT कमांडो आणि त्रिस्तरीय सुरक्षा; दहशतवादी तहव्वूरला आणण्यासाठी कडक सुरक्षा

बुलेटप्रूफ गाडी, SWAT कमांडो आणि त्रिस्तरीय सुरक्षा; दहशतवादी तहव्वूरला आणण्यासाठी कडक सुरक्षा

Tahawwur Rana Extradiction: मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. तहव्वुर राणा दिल्लीत पोहोचताच राष्ट्रीय तपास संस्था एनआयए त्याला मुंबई हल्ल्याप्रकरणी अटक करेल. दिल्लीत आणल्यानंतर राणाला तिहार तुरुंगात ठेवले जाऊ शकते. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असलेला तहव्वुर राणा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीचा साथीदार आहे. दरम्यान,राणाच्या प्रत्याप्रणासाठी दिल्लीत तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.

तहव्वुर राणाला काही तासांत भारतात आणण्यात येणार आहे. राणा दिल्ली विमानतळावर उतरताच, २६/११ हल्ल्याच्या खटल्यामध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या जातील. तहव्वुर राणाबाबत दिल्ली तसेच मुंबईतील सुरक्षा संस्थांनी त्यांची तयारी पूर्ण केली आहे. दहशतवादी तहव्वुर राणाला दिल्ली विमानतळावरून थेट एनआयए मुख्यालयात नेले जाईल. यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी एनआयए मुख्यालयात तहव्वुरची प्राथमिक चौकशी करू शकतात. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल तिथून त्याला रिमांडवर घेतले जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणा याच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली विमानतळाचेही छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. विमानतळाच्या आत आणि बाहेर, स्वॅट कमांडोसह विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. तहव्वुर दिल्ली विमानतळावर उतरताच, स्वॅट कमांडो त्याला एनआयए मुख्यालयात घेऊन जातील. त्याला बुलेटप्रूफ गाडीत बसवले जाईल. राणाच्या बुलेटप्रूफ कारसोबत ताफ्यात चिलखती वाहने असतील. राणाची गाडी त्रिस्तरीय सुरक्षा कवचात ठेवली जाईल. सुरक्षा संस्था आणि कमांडो तहव्वुरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतील.

दरम्यान, तहव्वुर राणाच्या खटल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नरेंदर मान यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. बुधवारी रात्री गृहमंत्रालयाने एक राजपत्रित अधिसूचना जारी करून तीन वर्षांसाठी या खटल्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अमेरिकेचा नागरिक असलेला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर हुसेन राणा यांनी लष्कर-ए-तैयबा आणि हरकत-उल जिहादी इस्लामीसोबत गुन्हेगारी कट रचला होता, असे या अधिसूचनेत म्हटलं आहे.

Web Title: Terrorist Tahawwur Rana will be brought from the airport to the NIA headquarters amid tight security Delhi Police SWAT team deployed for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.