श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात 2 जवान शहीद तर 12 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 20:56 IST2021-12-13T19:41:59+5:302021-12-13T20:56:18+5:30
या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात 2 जवान शहीद तर 12 जखमी
श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केले आहे. श्रीनगरच्या जीवन भागात सशस्त्र पोलिसांच्या 9व्या बटालियनवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Terrorists fired upon a police vehicle near Zewan in Pantha Chowk area of Srinagar. 14 personnel injured in the attack. All the injured personnel evacuated to hospital. Area cordoned off. Further details shall follow: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) December 13, 2021
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/IfEXEh3wii
मिळालेल्या माहितीनुसार, जवान बसमधून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पंथा चौक-खोनमोह रस्त्यावर भारतीय राखीव पोलिसांच्या (IRP) 9व्या बटालियनच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले, तर 12 जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांकडे शस्त्रे नव्हती, बसही बुलेटप्रूफ नव्हती
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसमधून जवान जात होते, ती बस बुलेटप्रूफ नव्हती. शिवाय, बहुतांश पोलिस कर्मचाऱ्यांकडे त्यांचा बचाव करण्यासाठी बंदुका आणि इतर साहित्यही नव्हते. फार कमी पोलिसांकडे शस्त्रे होती. तसेच, बस थांबवण्यासाठी दहशतवाद्यांनी आधी बसच्या टायरवर गोळीबार केला, त्यानंतर बसवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. हा गोळीबार इतका भीषण होता की, जवानांना स्वतःचा बचाव करण्याचा वेळही मिळाला नाही.
या पोलिसांवर हल्ला
या हल्ल्यावेळी बसमध्ये एएसआई गुलाम हसन, कॉन्स्टेबल सज्जाद अहमद, कॉन्स्टेबल रमीज अहमद, कॉन्स्टेबल बिशम्भर दास, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल संजय कुमार, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल विकास शर्मा, कॉन्स्टेबल अब्दुल मजीद, कॉन्स्टेबल मुदस्सिर अहमद, कॉन्स्टेबल रविकांत, कॉन्स्टेबल शौकत अली, कॉन्स्टेबल अरशीद मोहम्मद, कॉन्स्टेबल शफीक अली, कॉन्स्टेबल सतवीर शर्मा, कॉन्स्टेबल आदिल अली, हे जवान होते. दरम्यान, यातील गुलाम हसन आणि शफीक अली शहीद झाले आहेत.
ही दहशतवाद्यांची हतबलता: डीजीपी
गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतवादी जवानांना लक्ष्य करत आहेत. नुकतेच जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंह म्हणाले होते की, पोलिस दहशतवाद्यांपासून जनतेचे रक्षण करण्याचे काम करत आहेत. आमचे पोलीस आणि लष्कराचे जवान, बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स), सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) संयुक्तपणे दहशतवाद्यांना दूर ठेवत आहेत. त्यांच्या (दहशतवाद्यांच्या) हतबलतेमुळेच या हत्या होत आहेत. आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ.
चकमकीत दहशतवादी ठार
रविवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील बरगाम भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, त्यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.