Chandrayaan-2 : चंद्रावरील रहस्य उलगडणार, 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 11:22 AM2019-09-06T11:22:09+5:302019-09-06T11:31:53+5:30

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

'Terrifying' 15 Minutes Await Chandrayaan-2 as India's Ambitious Moon Mission Looks to Create History Tonight | Chandrayaan-2 : चंद्रावरील रहस्य उलगडणार, 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार!

Chandrayaan-2 : चंद्रावरील रहस्य उलगडणार, 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार!

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. याच दरम्यानची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘चांद्रयान-2’ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. 2 सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. चांद्रयान-2 ने चार चक्रव्यूह भेदली असून आणखी तीन बाकी आहेत. चंद्र कसा बनला आहे? चंद्रात बदल का होतो? चंद्रावरील अनेक रहस्यांचा उलगडा कधी होणार? चंद्रावर पाणी आहे, असलं तर किती आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात चांद्रयान 2  देणार आहे. मध्यरात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चांद्रयान चंद्रावर लँडिंग करणार आहे. 

के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्रापासून 30 किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-2 ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. याच दरम्यानची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही 15 मिनिटं आव्हानात्मक असतील.' सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्वी झाला आहे. 

महिन्याभरापासून अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 अखेर चंद्राच्या एकदम जवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटर वर असलेले हे यान शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचणार आहे. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा ठरणार आहे. अतिशय अवघड असणाऱ्या या मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. बंगळुरू येथील डीप स्पेस सेंटर येथील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल. चंद्रावर उतरताना विक्रम लँडर पुढे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे ते चंद्रवरील धुळीचे. यान उतरल्यावर या धुळीमुळे यानाचे सौर पॅनल तसेच कॅमेरा खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे उतरण्याआधी विक्रम वरील कॅमेऱ्याच्या साह्याने योग्य जागा शोधली जाणार आहे. चंद्रावरील मेंझिनिस सी आणि सिम्पेलिअस एन या दोन विवारांच्या मध्ये असणाऱ्या सपाट भागी यान उतरविले जाणार आहे.

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार 

इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. 

दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल 
 

Web Title: 'Terrifying' 15 Minutes Await Chandrayaan-2 as India's Ambitious Moon Mission Looks to Create History Tonight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.