जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
By हेमंत बावकर | Updated: September 26, 2025 10:23 IST2025-09-26T10:20:03+5:302025-09-26T10:23:26+5:30
Term Insurance Premium GST Cut: टर्म इन्शुरन्सचा प्रिमिअम भरण्याची तारीख २२ सप्टेंबर नंतरची असताना देखील काही कंपन्यांनी तो कमी केला नव्हता. जीएसटी कपातीनंतर हेल्थ इन्शुरन्ससह, टर्म इन्शुरन्सचवरील जीएसटी हा ० टक्के झाला आहे.

जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
- हेमंत बावकर
जीएसटीमधील कपात २२ सप्टेंबरला लागू झाली आहे. या दिवसापासून सर्वच उत्पादनांवरील जीएसटी कमी व्हायला हवा होता. परंतू, टर्म इन्शुरन्स कंपन्या ग्राहकांना त्यांचा जुनाच हप्ता भरा म्हणून मेसेज पाठवत होत्या. अखेर चार दिवसांनी म्हणजेच २५ सप्टेंबरला सायंकाळी शून्य टक्के जीएसटी हप्त्याचे मेसेज ग्राहकांना येऊ लागले आहेत. चार दिवस कंपन्या कशाची वाट पाहत होत्या असा सवाल ग्राहकवर्गातून उपस्थित होत आहे.
टर्म इन्शुरन्सचा प्रिमिअम भरण्याची तारीख २२ सप्टेंबर नंतरची असताना देखील कंपन्यांनी तो कमी केला नव्हता. आयसीआयसीआय लोंबार्डच्या अॅपवर एक ग्राहक जाऊन सारखे तपासत होता. तरीही त्याला जुनाच प्रिमिअम दिसत होता. हा जुना प्रिमिअम ४६२३ रुपये होता, तो आता २५ तारखेनंतर शून्य जीएसटीकरून ३९१७ रुपये झाला आहे. म्हणजेच जवळपास या ग्राहकाचे ७०६ रुपये कमी झाले आहेत. या रिव्हाईज जीएसटी कपातीचा प्रिमिअमचा मेसेज गुरुवारी करण्यात आला आहे. यामुळे जीएसटी कपात नव्या पॉलिसींवरच होणार की जुन्या पॉलिसींवरही याबाबत ग्राहक गेले ४ दिवस संभ्रमात होते.
अॅक्सिस मॅक्स लाईफचा टर्म इन्शुरन्स असलेल्या ग्राहकाचा ९७९ रुपयांचा प्रिमिअम ८२९ रुपये झाला आहे. मॅक्स लाईफच्या अन्य एका ग्राहकाचा आधीचा ७८३ रुपये होता तो आता ६६३ रुपये झाला आहे. तर या ग्राहकाच्या पत्नीचा प्रिमिअम ५४६ रुपये होता तो आता ४६२ रुपये झाला आहे. काल सायंकाळी या सर्व कंपन्यांनी प्रिमिअम रिव्हाईज केल्याचे मेसेज पाठविले आहेत.