चिनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव; भारतीय सैन्याचाही आक्रमक सतर्कतेचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:30 IST2020-05-25T02:10:40+5:302020-05-25T06:30:09+5:30
भारतीय सैन्याच्या आक्षेपांना न जुमानता चीनने तेथील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे.

चिनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव; भारतीय सैन्याचाही आक्रमक सतर्कतेचा पवित्रा
नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पॅनगाँग त्सो सरोवर व गलवान खोऱ्यात अधिक संख्येने सैन्य तैनात करून भारतीय लष्कराशी पंगा घेण्याचा आक्रमक पवित्रा लवकर न सोडण्याचे स्पष्ट संकेत चीन देत असल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनुसार खासकरून गेल्या दोन आठवड्यांत गलवान खोºयात १०० तंबू ठोकून व खंदक खणण्यासाठी अवजड यंत्रसामग्री आणून, भारतीय सैन्याच्या आक्षेपांना न जुमानता चीनने तेथील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. सूत्रांनुसार गेल्या आठवडाभरात पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या अनेक घटना घडल्याच्या बातम्या आहेत. यापैकी किमान दोन वेळा दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये झटापटही झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
असेही कळते की, याच आठवड्यात पॅनगाँग त्सो सरोवराजवळ गस्त घालणाºया भारतीय सैनिकांना चीनच्या सैनिकांनी अनेक वेळा अडविले. सूत्रांनुसार भारतीय लष्करही सीमेवरील पॅनगाँग त्सो सरोवर व गलवान खोरे या दोन्ही ठिकाणी चीनच्या वाढत्या उपस्थितीस जशाच तसे उत्तर देत आहे. त्यापैकी काही संवेदनशील भागांमध्ये भारताचे पारडे काहीसे जड आहे. देमचोक आणि दौलत बेग ओल्डी यासह अनेक संवेदनशील भागांमध्ये भारतीय सैन्य आक्रमक सतर्कता दाखवत सीमेवर सतत गस्त घालत आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सीमेवरील तणाव वाढत असताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लेह येथे भारतीय लष्कराच्या ‘१४ कॉर्प्स’च्या लेह येथील मुख्यालयास शुक्रवारी भेट देऊन तेथील सैन्याधिकाऱ्यांसोबत सीमेवरील सद्य:स्थितीवर सविस्तर चर्चा केली.
05 मेच्या संध्याकाळी चीन व भारताच्या सुमारे २५० सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्यानंतर पूर्व लडाखच्या सीमेवर तणाव वाढला आहे.
दोन्ही बाजूंचे सुमारे
100 सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर दोन्ही सैन्यांच्या स्थानिक कमांडरांनी बैठक घेऊन परिस्थिती शांत केली होती. पॅनगाँग त्सो येथील या घटनेनंतर तशीच घटना ९ मे रोजी उत्तर सिक्कीमच्या सीमेवरही घडली होती.