बिहार-नेपाळ सीमेवर खळबळ! नो मॅन्स लँडचे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:08 IST2025-05-29T09:07:57+5:302025-05-29T09:08:18+5:30

  भारताविरोधात एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीनच्या कुरापती सुरु आहेत. आता तर बांगलादेशही या शत्रू राष्ट्रांना जाऊन सामिल झाला ...

Tension on Bihar-Nepal border! Two Chinese youths arrested while filming a video of No Man's Land | बिहार-नेपाळ सीमेवर खळबळ! नो मॅन्स लँडचे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक

बिहार-नेपाळ सीमेवर खळबळ! नो मॅन्स लँडचे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक

 

भारताविरोधात एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीनच्या कुरापती सुरु आहेत. आता तर बांगलादेशही या शत्रू राष्ट्रांना जाऊन सामिल झाला आहे. हे तिन्ही देश भारताने नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून विशेष सुविधा दिलेली असल्याचा गैरफायदा घेत असतात. नेपाळचा मार्ग या देशांसाठी भारतात घुसण्याचा आणि बाहेर पडण्याचा तसेच स्मगलिंग करण्यासाठी सोपा ठरू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान आणि बांगलादेशी असे ३०-३५ संशयित व्यक्ती भारतात घुसण्यासाठी सीमेवर संधी शोधत असल्याचे वृत्त आले होते. तर आता दोन चिनी नागरिकांना सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 

बिहारच्या मधुबनी जिल्ह्याच्या नेपाळ सीमेवर एसएसबीने दोन चिनी तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा सापडलेला नाही. हे दोन्ही तरुण भारत-नेपाळ सीमेवरील नो मॅन्स लँडची व्हिडीओग्राफी करताना पकडले गेले आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून या दोघांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. 

जटही-पिपरौन बॉर्डरवरून या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे सीमेवर व्हिडीओ ग्राफी का करत होते, यामागचे कारण तपासले जात आहे. यापैकी एकाला फक्त चिनी भाषा येते, तर दुसरा तुटक तुटक इंग्रजी बोलत आहे. 

या दोघांनी कागदपत्र हॉटेलमध्ये ठेवल्याचे म्हटले आहे. यामुळे अद्याप त्यांची नावे आणि पत्ता सापडलेला नाही. चिनी नागरिकांना भारतीय सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्याने चीन पुन्हा सीमेवर काहीतरी आगळीक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ४८ व्या बटालियन जयनगरचे पिप्राव एसएसबीचे प्रभारी निरीक्षक सुनील दत्त आणि हरलाखीचे एसएचओ निरीक्षक अनुप कुमार आणि अतिरिक्त पोलिस स्टेशन प्रमुख आदित्य कुमार या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आयबीचे अधिकारी देखील सक्रीय झाले आहेत. 

Web Title: Tension on Bihar-Nepal border! Two Chinese youths arrested while filming a video of No Man's Land