"अगोदरच माहिती होतं, तरीही..."; बाहेर आलेल्या कामगारांनी सांगितली बोगद्याच्या आतली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:49 IST2025-02-24T13:49:16+5:302025-02-24T13:49:35+5:30

श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याच्या बाहेर आलेल्या कामगारांनी सांगितली आतली परिस्थिती.

Telangana SLBC Tunnel workers who came out told how the situation was inside the tunnel | "अगोदरच माहिती होतं, तरीही..."; बाहेर आलेल्या कामगारांनी सांगितली बोगद्याच्या आतली परिस्थिती

"अगोदरच माहिती होतं, तरीही..."; बाहेर आलेल्या कामगारांनी सांगितली बोगद्याच्या आतली परिस्थिती

Telangana Tunnel Collapse:तेलंगणातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याच्या दुर्घटनेनंतर अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचाव पथक आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तेलंगणाचे मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांनी श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्यात दोन दिवसांपूर्वी बांधकामाधीन विभाग अर्धवट कोसळल्यानंतर अडकलेल्या आठ लोकांच्या वाचण्याची शक्यता आता खूपच कमी आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच बोगद्याच्या बांधकामाशी संबंधित एका वेल्डरने या घटनेबाबत अनेक खुलासे केले आहेत. बोगद्यात पाणी गळती झाल्याची माहिती कामगारांनी आधीच दिली होती, असे वेल्डरने सांगितले.

तेलंगणाच्या श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याच्या अपघाताबाबत बचाव कार्य अद्याप चालू आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ व्यतिरिक्त अनेक यंत्रणा बचाव कार्यात गुंतल्या आहेत. मात्र अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. ३० तासांहून अधिक काळ बोगद्यात अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढण्याच्या बचाव मोहिमेला रविवारीही यश आले नाही. या घटनेबाबत वेल्डरने धक्कादायक माहिती दिली आहे. कामासाठी आत जावं लागल्याचे वेल्डरने म्हटलं आहे.

शनिवारी २२ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता बोगद्यात गेलेल्या ५० जणांमध्ये संजय साह यांचाही समावेश होता. बोगद्याच्या सुमारे १३.५ किलोमीटर आत छताचा काही भाग कोसळला. यानंतर सर्व कामगार सुखरूप बाहेर पळत सुटले. मात्र बोगद्यातून बाहेर आल्यानंतर आठ जण बाहेर पडू शकले नाहीत हे इतरांच्या लक्षात आले आणि त्यांनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आठ कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. "हे धोकादायक काम आहे हे आमच्याप्रमाणेच कामगारांनाही माहीत होते. मात्र या कामातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आपण अनेकदा पाणी गळतीच्या छोट्या घटनांबद्दल बोलतो. पण मजबुरी आहे, काम करावे लागेल," असं वेल्डर संजय साह यांनी म्हटलं.

"रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी बोगद्यातून पाणी गळती होत असल्याची माहिती दिली होती. असे अनेकवेळा घडले आहे. असे असूनही मी सावधपणे आत गेलो. आम्ही बोगद्यात १३ किलोमीटरहून अधिक चालत गेले ज्यासाठी सुमारे एक तास लागला. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर १५-२० मिनिटांतच मातीचे तुकडे पडू लागले. आत जिथे घटना घडली मी फक्त २० मीटर अंतरावर होतो. शिफ्ट इनचार्जने आम्हाला तेथून पुढे जाण्यास सांगितले आणि अलार्म वाजला. आम्ही धावलो आणि काही मिनिटांतच मोठा आवाज झाला आणि बोगद्याचा काही भाग कोसळला. आम्ही बाहेर आलो तेव्हा आठ जण बाहेर पडू शकले नसल्याचे कळले," असे संजय साह यांनी सांगितले.

Web Title: Telangana SLBC Tunnel workers who came out told how the situation was inside the tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.