सायबर पोलिसांनी फसवणूक झालेल्यांना मिळवून दिले ६२.४६ लाख रुपये; केलं महत्त्वाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 18:19 IST2025-02-22T18:17:47+5:302025-02-22T18:19:31+5:30
तेलंगणात सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केलेल्या लोकांचे ६२ लाख रुपये पोलिसांनी परत केले आहेत.

सायबर पोलिसांनी फसवणूक झालेल्यांना मिळवून दिले ६२.४६ लाख रुपये; केलं महत्त्वाचे आवाहन
Hyderabad Cybercrime Police: हैदराबाद सायबर पोलिसांनी मोठी कामगिरी करत फसवणूक झालेल्यांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले आहेत. हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत १६ वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एकूण ६२,४६,९०० रुपये परत केले आहेत. फसवणूक करणाऱ्यांनी पीडितांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या होत्या. ज्यात स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक घोटाळे, फेडेक्स आणि मनी लाँड्रिंग फसवणूक, कर्ज फसवणूक आणि तोतयागिरी यांचा समावेश होता.
यापैकी आठ जण स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक घोटाळ्यांना बळी पडले होते. त्यांना फसवणूक करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याचे आश्वासन दिले आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना १२,१६,७७३ रुपयांचा परतावा देण्याचे आदेश दिले. तर फेडएक्स आणि मनी लाँड्रिंग घोटाळ्याद्वारे सहा जणाची फसवणूक झाली होती. ज्यामध्ये घोटाळेबाजांनी अधिकारी असल्याचे भासवून कायदेशीर कारवाईची धमकी देत लोकांना लुटले होते. सायबर पोलिसांमुळे पीडितांना त्यांचे ४७,८५,७५९ रुपये परत मिळाले आहे.
कर्ज फसवणुकीच्या एका पीडितेला कर्ज मिळवून देतो असं सांगून लुबाडण्यात आलं होतं. पोलिसांच्या कारवाईनंतर त्याला १,२४,३३४ रुपये परत मिळाले आहेत. तर दुसऱ्या पीडितेला बनावट कंपनीच्या बिलाद्वारे फसवणूकीच्या प्रकरणात फसवले गेले होते. त्याला देखील त्याचे १,२०,२२१ रुपये परत मिळाले. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी अनुषा यांनी दिलेल्या आदेशानंतर सायबर गुन्हे पोलीस पथकांने पीडितांना त्यांचे पैसे मिळवून दिले आहेत.
सीबीआय, ईडी, आरबीआय, कस्टम्स, न्यायाधिश, सायबर क्राइम पोलिस, नार्कोटिक्स, सारख्या यंत्रणांचे अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींकडून धमकीचे व्हिडिओ कॉल आल्यास घाबरू नका असे आवाहन सायबर क्राइम पोलिसांनी केले आहे. कोणतीही सरकारी संस्था किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था स्काईप कॉलद्वारे पैशांची मागणी करत नाही किंवा ते डिजिटल अरेस्ट किंवा चौकशी करत नाहीत.
सायबर क्राइम पोलिसांनी टेलीग्राम, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट गुंतवणूकदारांना इशारा देखील दिला आहे. पोलिसांनी नागरिकांना केवळ सेबीने मंजूरी दिलेल्या ॲप्सद्वारेच गुंतवणूक करावी आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा, असंही सांगितले.