लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:53 IST2025-11-16T15:51:19+5:302025-11-16T15:53:28+5:30
Tejashwi Yadav vs Rohini Acharya: पराभवाचे खापर फोडत पक्षाचे युवा नेते तेजस्वी यादव यांनी आपली मोठी बहीण रोहिणी आचार्य हिला जबाबदार धरले असून, यावरून दोघांमध्ये तुफान वाद झाल्याचे वृत्त आहे.

लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
बिहार विधानसभा निवडणुकीतील महागठबंधनच्या दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या यादव कुटुंबातील अंतर्गत कलह आता अत्यंत कडवट आणि सार्वजनिक झाला आहे. पराभवाचे खापर फोडत पक्षाचे युवा नेते तेजस्वी यादव यांनी आपली मोठी बहीण रोहिणी आचार्य हिला जबाबदार धरले असून, यावरून दोघांमध्ये तुफान वाद झाल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव यांनी रागाच्या भरात रोहिणी आचार्य यांना अपशब्द वापरले आणि "तुझ्यामुळेच आम्ही निवडणूक हरलो आणि आम्हाला शाप लागला आहे," असे सुनावले. या वादादरम्यान तेजस्वी यांनी रोहिणीवर चप्पल फेकल्याचा गंभीर आरोपही रोहिणी आचार्य यांनी केला आहे.
या सर्व प्रकारानंतर रोहिणी आचार्य यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत कुटुंबाशी संबंध तोडल्याचे आणि राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले. "मी कुटुंबातून बाहेर काढण्याची आणि झालेल्या अपमानाची सर्व जबाबदारी स्वीकारते," असे त्यांनी म्हटले आहे.
किडनी दानावरही प्रश्नचिन्ह
रोहिणी आचार्य यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत भावनिक आणि धक्कादायक खुलासा केला. त्यांना केवळ अपशब्द वापरले गेले नाहीत, तर त्यांच्यावर "करोडो रुपये घेऊन, तिकीट खरेदी करून वडिलांना निकामी किडनी दान केली," असा खोटा आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
रोहिणी यांनी इतर विवाहित महिलांना सल्ला दिला की, "आपल्या माहेरच्या कुटुंबासाठी किंवा वडिलांसाठी स्वतःच्या संसाराची पर्वा करू नका. रोहिणीसारखी चूक कोणी करू नका; कोणत्याही कुटुंबात रोहिणीसारखी मुलगी नसावी."
लालू प्रसाद यादव यांना २०२२ मध्ये रोहिणी यांनीच आपली किडनी दान केली होती. वडिलांसाठी केलेल्या त्यागाबद्दलही कुटुंबात अपमान झाल्यामुळे आरजेडीतील फूट आता टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.