Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:07 IST2025-10-18T15:05:36+5:302025-10-18T15:07:02+5:30
Tejashwi Yadav vs Tej Pratap Yadav: लालू प्रसाद यादवांनी कुटुंबातून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यादव जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नवा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी तेजस्वी यादवांविरोधात उमेदवारही उतरवला आहे.

Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
Bihar Election Yadav Family: यादव कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या राघोपूर विधानसभा मतदारसंघात यावेळी रंगतदार लढाई होताना दिसणार आहे. तेजस्वी यादव या मतदारसंघातून निवडणूक लढत असून, त्यांच्याविरोधात तेज प्रताप यादव यांनीही आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे दोन्ही भावातील राजकीय संघर्ष आणखी वाढताना दिसू शकतो. तेज प्रताप यादव यांनी युवक राष्ट्रीय जनता दलाचे माजी महासचिव प्रेम कुमार यादव याना उमेदवारी दिली आहे.
तेज प्रताप यादव यांना विधानसभा निवडणूक लागण्याच्या काही महिने आधी लालू प्रसाद यादवांनी कुटुंबातून बाहेर काढले. त्यानंतर तेज प्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल या पक्षाची स्थापना केली. बिहार विधानसभा निवडणुकीत ते स्वतःही उतरले असून, तेजस्वी यादव निवडणूक लढवत असलेल्या राघोपूर विधानसभा मतदारसंघातून प्रेम कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे.
प्रेम कुमार यादव हे राघोपूरचेच रहिवाशी आहेत. पूर्वी ते लाल प्रसाद यादव यांच्याच राष्ट्रीय जनता दलामध्ये होते. युवक राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. तेज प्रताप यादव पक्षातून बाहेर पडल्यानंतर प्रेम कुमार यादव यांनीही राजद सोडली.
तेज प्रताप यादव महुआतून लढणार
जनशक्ती जनता दल पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले तेज प्रताप यादव हेही विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तेज प्रताप यादव यांनी १५ ऑक्टोबर रोजी वैशाली जिल्ह्यातील महुआ विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महुआ विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी यादव यांनी राजदच्या मुकेश रौशन यांना उमेदवारी दिली आहे. ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पण, यादव कुटुंबातीलच तेज प्रताप यादव या मतदारसंघातून उतरल्याने येथील निवडणूकही चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.