दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 06:12 IST2025-08-04T06:12:37+5:302025-08-04T06:12:50+5:30
तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते...

दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
एस. पी. सिन्हा -
पाटणा : आपल्याकडे दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतील व्होटर कार्ड असल्याचा व त्यापैकी एकाचे रेकॉर्ड मिळत नसल्याचा अलीकडेच दावा करणारे बिहारचे विरोधी पक्षनेते व राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस जारी करून ईपीआयसी क्रमांक आरएबी २९१६१२० चा तपशील मागितला आहे.
तेजस्वी यांनी म्हटले होते की, त्यांचे नाव एका मतदार यादीत आढळले नाही. त्यावर आयोगाने म्हटले आहे की, तुम्ही ज्या क्रमांकाचा उल्लेख करीत आहात, त्याची माहिती द्यावी. तुमचे नाव मतदान केंद्र २०४ च्या ४१६ पानावर आहे. त्याचा ईपीआयसी क्रमांक आरएबी ०४५६२२८ आहे. परंतु तुम्ही पत्रपरिषदेत दावा केला आहे की, तुम्ही ईपीआयसी क्रमांक आरएबी २९१६१२० शोधला आहे. असा कोणताही ईपीआयसी क्रमांक आयोगाने जारी केलेला नाही. त्यामुळे या मतदार ओळखपत्राचे संपूर्ण विवरण द्यावे. त्या आधारे त्याची तपासणी करता येईल.
तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते.
बिहार यादीवर कोणाचीही तक्रार नाही : आयोग
नवी दिल्ली : बिहारमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने १ ऑगस्टला प्रकाशित मतदार यादीमध्ये नाव सामील करण्याबाबत किंवा हटवण्याबाबत संपर्क साधलेला नाही, असे निवडणूक आयोगाने रविवारी म्हटले. १ ऑगस्टच्या दुपारी तीनपासून ३ ऑगस्टच्या दुपारी तीनपर्यंत दावे किंवा आक्षेपबाबत कुणीही संपर्क साधलेला नाही. तथापि, व्यक्तिगत रूपात मतदारांकडून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा अपात्र लोकांची नावे हटवण्यासाठी ९४१ दावे व आक्षेप प्राप्त झाले आहेत. राजकीय पक्ष व मतदारांकडे दावे, आक्षेप सादर करण्यास १ सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे.
बिहारमध्ये ६५ लाख मतदार मतदानापासून वंचित होण्याचा धोका वाढला आहे. दुसरीकडे तामिळनाडूत ६.५ लाख लोकांचा मतदार यादीत समावेश करण्यासंदर्भात समोर आलेली माहिती चिंताजनक व बेकायदेशीर आहे.
पी. चिदंबरम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
निवडणूक आयोगाचा प्रामाणिकपणा संशयास्पद आहे. त्यामुळे मतदार याद्यांच्या संशोधनावर विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत चर्चा हवी आहे. सरकार काहीतरी लपवू पाहत आहे. ते नेमके काय आहे?
गौरव गोगोई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते