तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:07 IST2025-11-14T13:06:03+5:302025-11-14T13:07:01+5:30
Tej Pratap Yadav, Bihar Election Result :महुआ मतदारसंघात मतमोजणीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार, तेज प्रताप यादव हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय?
बिहार निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या वैशाली जिल्ह्यातील महुआ विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांना येथे मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. सात फेऱ्यांमध्ये तेजप्रताप यादवांना केवळ 4399 मते मिळाली आहेत.
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
महुआ मतदारसंघात मतमोजणीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार, तेज प्रताप यादव हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. ते पहिल्या क्रमांकावर असलेल्या लोजपा (राम विलास) च्या संजय कुमार सिंह यांच्यापासून खूप दूर आहेत. सहाव्या फेरीपर्यंत, लोजपाचे संजय सिंह यांना १९,१०६ मते मिळाली आहेत आणि ते ५,२७८ मतांनी आघाडीवर आहेत. आरजेडीचे मुकेश रोशन १३,८२८ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. ओवेसींच्या पक्षाचे अमित कुमार यांना 6875 मते मिळाली आहेत. यानंतर लालुंच्या मोठ्या मुलाचा नंबर लागत आहे.
याच मतदारसंघातून राजदने विद्यमान आमदार डॉ. मुकेश रोशन यांना उमेदवारी दिली आहे. रोशन हे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा थेट मुकाबला संजय कुमार सिंह यांच्याशी आहे.
महुआ ठरला 'भाऊ विरुद्ध पक्ष' संघर्ष
२०१५ मध्ये तेज प्रताप यादव याच महुआ मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, पक्ष आणि कुटुंबातील मतभेदानंतर त्यांनी हसनपूरकडे आपला मोर्चा वळवला. आता २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी आपला स्वतःचा पक्ष 'जनशक्ती जनता दल' (JJD) स्थापन करून पुन्हा महुआ गाठले. मात्र, हा निर्णय त्यांच्यासाठी आत्मघाती ठरल्याचे दिसत आहे. तेज प्रताप यांच्या उमेदवारीमुळे महाआघाडीच्या (RJD) मतांमध्ये मोठी फूट पडली, ज्याचा थेट फायदा लोजपा (राम विलास) च्या उमेदवाराला मिळाला. पाचव्या फेरीपर्यंत तेज प्रताप १०,७७६ मतांनी पिछाडीवर होते. बिहारमधील हा 'भाऊ विरुद्ध पक्ष' संघर्ष राजदसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. हाच मुद्दा राजदच्या जागा कमी येण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.