Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:33 IST2025-11-18T19:33:02+5:302025-11-18T19:33:55+5:30
Tej Pratap Yadav : लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी मंगळवारी आपली बहीण रोहिणी आचार्य यांना पाठिंबा दिला.

Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी मंगळवारी आपली बहीण रोहिणी आचार्य यांना पाठिंबा दिला. रोहिणी यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांचा भाऊ तेजस्वी यादव आणि त्यांचा सहकारी संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याच दरम्यान तेज प्रताप यांनी केंद्र आणि बिहार सरकारला त्यांच्या पालकांना कोणत्याही प्रकारचा मानसिक छळ सहन करावा लागत आहे का? याची चौकशी करण्याची विनंती केली आहे.
तेज प्रताप यादव यांनी या संकटासाठी काही लोकांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहार सरकारकडून त्वरित आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करत मदत मागितली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, काही लोक त्यांचे पालक लालूप्रसाद यादव आणि आई यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. जर यात थोडेसंही तथ्य असेल तर हा केवळ त्यांच्या कुटुंबावर हल्ला नाही तर राजदच्या आत्म्यावर थेट हल्ला आहे. कोणत्याही परिस्थितीत बहिणीचा अपमान सहन करणार नाही.
तेज प्रताप यांनी सरकारला अशी विनंती केली की, जर कोणी त्यांच्या बहिणी, आई-वडिलांशी गैरवर्तन केलं, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली किंवा मानसिक/शारीरिक त्रास दिला तर संजय यादव, रमीज नेमत खान आणि प्रीतम यादव सारख्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करावा. रोहिणी दीदींसोबत जे घडलं ते पाहून धक्का बसला आहे.
"तिकीट वाटपातील अनियमितता, पैशाच्या बदल्यात तिकीट देण्याची पद्धत आणि चमचेगिरी करणाऱ्यांच्या संगनमतामुळे गेल्या काही वर्षांपासून राजद उभारणीसाठी दिवसरात्र काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष झालं आहे. आज हेच लोक लोभापायी कुटुंब आणि संघटना दोन्ही नष्ट करत आहेत" असं देखील तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.