Shocking: महागड्या फोनसाठी वडिलांसोबत वाद; १७ वर्षीय मुलाची १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:50 IST2025-12-08T09:49:39+5:302025-12-08T09:50:16+5:30
Gujarat Kukma Village News: गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली.

Shocking: महागड्या फोनसाठी वडिलांसोबत वाद; १७ वर्षीय मुलाची १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी!
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कुकमा गावात एका १७ वर्षांच्या मुलाने मोबाईलवरून झालेल्या घरगुती भांडणानंतर फार्महाऊसमधील १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी घेतली. सुमारे आठ तास चाललेल्या अथक बचावकार्यानंतरही मुलाला वाचवण्यात यश आले नाही आणि त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक एमजे क्रिश्चियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुस्तम शेख (वय, १७) असे मृत मुलाचे नाव आहे. रुस्तम हा मूळचा झारखंडचा रहिवासी होता. शनिवारी (०६ डिसेंबर २०२५) संध्याकाळी रुस्तमचे त्याच्या वडिलांशी महागड्या मोबाईलवरून वाद झाला. दानंतर संतप्त झालेल्या रुस्तमने गावातील एका फार्महाऊसमध्ये असलेल्या १.५ फूट रुंदीच्या, १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी मारली.
घटनेची माहिती सायंकाळी ६.३० वाजता पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी बोअरवेल ऑपरेटर आणि इतर बचाव संस्थांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. जवळजवळ आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला ताबडतोब जीके जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असली तरी प्रथमदर्शनी ही आत्महत्या मानली जात आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.