टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची कोठडी; भ्रष्टाचार प्रकरणी केली होती अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 19:37 IST2023-09-10T19:36:36+5:302023-09-10T19:37:02+5:30
तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणी एसीबी न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची कोठडी; भ्रष्टाचार प्रकरणी केली होती अटक
तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोर्टाने एका भ्रष्टाचार प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. नायडू यांना १४ दिवस राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
माजी मुख्यमंत्री नायडू यांना शनिवारी रात्री ३.४० वाजता वैद्यकीय तपासणीसाठी विजयवाडा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. याअगोदर त्यांची कुंचनपल्ली येथे सुमारे १० तास चौकशी करण्यात आली.
CID पथकाने माजी केंद्रीय मंत्री नायडू यांना शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता नांद्याल शहरातील ज्ञानपुरम येथील आरके फंक्शन हॉलच्या बाहेरून अटक केली. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या त्यांच्या बसमध्ये झोपलेले असताना नायडू यांना अटक करण्यात आली.
काय प्रकरण आहे?
कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात ते मुख्य सूत्रधारअसल्याचे आंध्र प्रदेश पोलिसांनी म्हटले होते. या कथित घोटाळ्यामुळे राज्य सरकारचे ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.