भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; अन्नामलाई यांनी दिला पदाचा राजीनामा, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:22 IST2025-04-04T21:21:48+5:302025-04-04T21:22:12+5:30

Tamilnadu BJP : भाजपचे दक्षिणेतील फायरब्रँड नेते के. अन्नामलाई यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Tamilnadu BJP: K Annamalai resigns as state president post, what is the reason..? | भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; अन्नामलाई यांनी दिला पदाचा राजीनामा, कारण काय..?

भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; अन्नामलाई यांनी दिला पदाचा राजीनामा, कारण काय..?


Tamilnadu BJP : पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि दक्षिणेतील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेल्या के. अन्नामलाई यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. आता अखेर या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या. 

शुक्रवारी कोईम्बतूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णामलाई म्हणाले की, काही लोक म्हणतात की, मी दिल्लीला गेलो आणि इकडे नवीन नेता निवडला गेला. मी अशा चर्चेत सामील नसतो. मी या शर्यतीतच नाही. पक्ष मजबूत असला पाहिजे, असे माझे मत आहे. भाजप असा पक्ष आहे, जिथे चांगले लोक येऊ शकतात. हा पक्ष वाढवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. तामिळनाडू भाजपमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही सर्वानुमते नेत्याची निवड करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, अन्नामलाई यांच्यानंतर नैनर नागेंद्रन यांना पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

पद जाण्याचे काय कारण?
अण्णामलाई यांचे अध्यक्षपद जाण्याचे कारण 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि AIADMK यांच्यातील युती आहे. आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष युती करण्याची दाट शक्यता आहे. अलीकडेच माजी मुख्यमंत्री आणि AIADMK सरचिटणीस के. पलानीस्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत अण्णाद्रमुक पुन्हा एकदा एनडीएसोबत युती करणार असल्याची चर्चा तीव्र झाली आहे. AIADMK ने NDA सोबत 2021 च्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या.

AIADMK ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी NDA सोबतची युती तोडली होती. तेव्हा अण्णामलाई यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान केल्याचा आरोप अण्णाद्रमुकने केला होता. युती तुटल्याने भाजपला राज्यात मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. एआयएडीएमकेलाही मोठे नुकसान झाले. पण, आता 2026 च्या निवडणुका जवळ आल्याने दोन्ही पक्षांची पुन्हा युती होण्याची शक्यता आहे. यामुळेच अन्नामलाई यांना पदावरुन बाजूला केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Tamilnadu BJP: K Annamalai resigns as state president post, what is the reason..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.