"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 21:45 IST2025-07-05T21:42:01+5:302025-07-05T21:45:36+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना हिंदीच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला आहे.

"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
M.K. Stalin on Raj & Uddhav Thackeray: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी ठाकरे बंधू एकत्र येत हिंदी सक्तीच्या मु्द्द्यावरुन केंद्रासह राज्य सरकारला फटकारलं. राज ठाकरे यांनी भाषण करताना हिंदीविरोधात एकवटलेल्या दाक्षिणात्य राज्यांचा आणि तिथल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख केला. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना हिंदीच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला आहे.
राज्य सरकारने पहिलापासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा पार पडला. यावेळी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. हिंदी भाषेच्या मु्द्यावरुन बोलताना उद्धव आणि राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. जर गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तर आमच्यावर काहीही लादण्याचा प्रयत्न करु नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक्स पोस्टवरुन राज आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले.
भाजपने दुसऱ्यांदा माघार घेतली
"हिंदी लादण्याविरुद्ध द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूचे लोक पिढ्यानपिढ्या लढत असलेले भाषा हक्काचे युद्ध आता राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात वावटळीसारखे फिरत आहे. तामिळनाडूच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवले तरच निधी दिला जाईल असे सांगून बेकायदेशीर आणि अराजक पद्धतीने वागणारा भाजप सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात लोकांचा उठाव होईल या भीतीने दुसऱ्यांदा माघार घेत आहे. हिंदी लादण्याच्या निषेधार्थ आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आयोजित विजय रॅलीतील उत्साह खूप उत्साहवर्धक होता," असं एमके स्टॅलिन म्हणाले.
सरकारकडे राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत
"उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोणती तिसरी भाषा शिकवली जाते? आणि हिंदी भाषिक राज्ये मागासलेली आहेत. तुम्ही प्रगत राज्यांमधील लोकांवर हिंदी का लादत आहात? मला चांगलेच माहिती आहे की हिंदी आणि संस्कृतच्या विकासाला पूर्णवेळ प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे राज ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्रिभाषिक धोरणाच्या नावाखाली हिंदी आणि संस्कृत लादणारे नवीन शिक्षण धोरण स्वीकारले तरच एकात्मिक शिक्षण प्रकल्पातून २,१५२ कोटी रुपये दिले जातील असे सांगून केंद्र सरकार तामिळनाडूवर सूड घेण्याचा आपला मार्ग निर्णय का? तामिळनाडूच्या शालेय मुलांच्या शिक्षणासाठी कायदेशीररित्या आवश्यक असलेला निधी त्वरित जारी करेल का?," असा सवाल एमके स्टॅलिन यांनी केला.
हिंदी लादल्यामुळे अनेक भारतीय भाषा नष्ट झाल्याचा इतिहास
"हिंदी वर्चस्वाविरुद्ध तामिळनाडूतील लोकांचा संघर्ष केवळ भावनिकच नाही तर बौद्धिक आणि तार्किक आहे. हिंदी लादल्यामुळे अनेक भारतीय भाषा नष्ट झाल्याचा इतिहास न जाणता आणि भारताला हिंदी राष्ट्र बनवण्याचा अजेंडा न समजता, "हिंदी शिकलात तर नोकरी मिळेल" असं सांगणाऱ्या काही भोळ्या लोकांनी आपलं म्हणणं बदललं पाहिजे. कीझाडी संस्कृतीला मान्यता देण्यास नकार देण्याचा अहंकार आणि तमिळनाडूला निधी वाटपात होणारी फसवणूक आम्ही चालू ठेवू देणार नाही. भाजपने तमिळ आणि तमिळनाडूविरुद्ध करत असलेल्या विश्वासघातावर उपाय शोधला पाहिजे. अन्यथा, तमिळनाडू पुन्हा एकदा त्यांना आणि त्यांच्या नवीन मित्रांना एक अविस्मरणीय धडा शिकवेल! चला एकत्र येऊया!," असंही एमके स्टॅलिन यांनी म्हटलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
"दक्षिण भारतात जाऊन पहा, तमिळ भाषेच्या प्रश्नावर तेलुगू भाषेच्या प्रश्नावर सगळेजण कडवटपणे उभे राहतात. त्यांना कोणी विचारत नाहीत तुमची मुले कुठल्या माध्यमात शिकतात. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेन आणि कडवट मराठी बाणा बाळगेन, कोणाला त्याची अडचण? दक्षिणेतील इंग्रजी माध्यमात शिकलेल्या नेत्यांची अभिनेत्यांची मी यादी आणली आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.