केजरीवाल पंजाबचे CM बनण्याची चर्चा, दिल्लीतील आपच्या बैठकीनंतर भगवंत मान यांचं मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:08 IST2025-02-11T14:07:32+5:302025-02-11T14:08:02+5:30

Bhagwant Maan News: आज दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यातील आपच्या आमदार आणि खासदारांसोबत अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती देतानाच सध्याच्या घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे. 

Talks about Kejriwal becoming CM of Punjab, Bhagwant Mann's big statement after AAP meeting in Delhi, said... | केजरीवाल पंजाबचे CM बनण्याची चर्चा, दिल्लीतील आपच्या बैठकीनंतर भगवंत मान यांचं मोठं विधान, म्हणाले...  

केजरीवाल पंजाबचे CM बनण्याची चर्चा, दिल्लीतील आपच्या बैठकीनंतर भगवंत मान यांचं मोठं विधान, म्हणाले...  

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर स्वत: अरविंद केजरीवाल हेही त्यांच्या मतदारसंघात पराभूत झाले. या पराभवानंतर आपची सत्ता असलेल्या पंजाबमधील सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पंजाबमधील आम आदमी पक्षामध्ये फूट पडण्याचे दावे केले जात होते. तसेच केजरीवाल हे पंजाबचं मुख्यमंत्रिपद स्वीकारू शकतात, असेही सांगितले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यातील आपच्या आमदार आणि खासदारांसोबत अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती देतानाच सध्याच्या घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे.

भगवंत मान म्हणाले की, पंजाब सरकारचं संपूर्ण कॅबिनेट आणि आमच्या सर्व आमदारांनी कपूरथला हाऊसमध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठकीत सहभाग घेतला. आम आदमी पक्षाच्या पंजाब संघटनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली होती. त्यासाठी अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी पंजाबमधील नेत्यांचे आभार मानले. पंजाबमधील आमचं सरकार लोकांच्या हितासाठी वीज, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात खूप काम करत आहे.

भगवंत मान पुढे म्हणाले की, आपच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात दिल्लीत जे काम झालं तेवढं काम मागच्या ७५ वर्षांत झालं नव्हतं. हारजीत राजकारणाचा भाग आहे. आम्ही दिल्लीत आलेल्या अनुभवाचा उपयोग पंजाबमध्ये करणार आहोत. आम्ही दिल्लीतील जनादेशाचा सन्मान करतो. आता आम्ही पंजाबला एक मॉडेल स्टेट म्हणून विकसित करू. आम्ही असं पंजाब राज्य घडवू की संपूर्ण देश त्याकडे पाहील. आम्हाला विकासकामांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. आमची पार्श्वभूमी सर्वसामान्य आहे. अधिकाधिक लोकांचं मन कसं जिंकता येईल, या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. मागच्या काही काळात मोठमोठ्या कंपन्यांकडून पंजाबमध्ये गुंतवणूक होत आहे.

आम आदमी पक्षाचे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा प्रताप सिंह बाजवा यांनी केलेला दावा भगवंत मान यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, ते मागच्या तीन वर्षांपासून आम आदमी पक्षाचे ३० ते ४० आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. त्यांना असे दावे करत राहू द्या.  त्यांनी आपच्या आमदारांची काळजी सोडून दिल्लीतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोजली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भगवंत मान हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात असून, कुठल्याही क्षणी बंड करू शकतात, असा दावा काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मान म्हणाले की, त्यांना बोलायचं ते बोलू द्या. त्यांनी असे दावे करणं सुरू ठेवावं. त्यांच्या पक्षात अशी संस्कृती आहे. त्यामुळे ते असे दावे करतात. आम्ही हा पक्ष आम्ही मेहनतीने उभा केला आहे. त्यामुळे हा पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  
 

Web Title: Talks about Kejriwal becoming CM of Punjab, Bhagwant Mann's big statement after AAP meeting in Delhi, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.