हत्येचा बदला घेणारच! शहीद जवान औरंगजेबचे 50 मित्र नोकरी सोडून मायदेशात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 15:52 IST2018-08-04T15:50:35+5:302018-08-04T15:52:00+5:30
जूनमध्ये दहशतवाद्यांनी औरंगजेब यांची अपहरण करुन हत्या केली होती

हत्येचा बदला घेणारच! शहीद जवान औरंगजेबचे 50 मित्र नोकरी सोडून मायदेशात दाखल
नवी दिल्ली: सुरक्षा दलाचे जवान औरंगजेब यांच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी त्यांचे 50 हून अधिक मित्र आखाती देशांमधून परतले आहेत. पोलीस आणि लष्करात दाखल होऊन औरंगजेबच्या हत्येचा बदला घेण्याचा त्यांचा मानस आहे. जूनमध्ये सुरक्षा दलाचे जवान औरंगजेब यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली होती.
औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांचे 50 हून अधिक मित्र आखाती देशांमधील चांगल्या नोकऱ्या सोडून माघारी परतले आहेत. यातील बहुतेकजण सौदी अरेबियात काम करत होते. पोलीस किंवा सैन्यात भरती होऊन मित्राच्या हत्येचा बदला घेण्याचा त्यांचा इरादा आहे. जून महिन्यात औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी त्यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. मुलाच्या हत्या बदला घेऊ, अशी शपथ त्यावेळी शोकसागरात बुडालेल्या औरंगजेब यांच्या वडिलांनी घेतली होती. आता दोन महिन्यांनंतर औरंगजेब यांच्या सलानी गावातील 50 हून अधिक तरुण परदेशातील नोकऱ्या सोडून मायदेशी परतले आहेत.
आम्ही 50 मित्रांनी औरंगजेबच्या मृत्यूची माहिती मिळताच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता, असं मोहम्मद किरामत आणि मोहम्मद ताज यांनी सांगितलं. आम्हाला आमच्या मित्राचा हत्येचा बदला घ्यायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या काश्मीर खोऱ्यातील अनेक जवानांना दहशतवाद्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. सैन्यातील नोकरी सोडा अन्य मरणास तयार राहा, अशा धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात येत आहेत. जूनपासून आतापर्यंत दहशतवाद्यांनी तीन जवानांच्या हत्या केल्या आहेत.