पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 18:28 IST2019-03-06T18:20:40+5:302019-03-06T18:28:42+5:30
पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ''पुढच्या वेळी भारताकडून अशी कारवाई होत असताना जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना विमानाखाली बांधून घेऊन जावे, असे व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी लष्करप्रमुख आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्ही. के. सिंह यांनी एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ''पुढच्या वेळी जेव्हा अशी कारवाई होईल, तेव्हा विरोधी पक्षांमधील जी मंडळी शंका घेते त्यांनाही हवाई दलाने विमानाखाली बांधून सोबत नेले पाहिजे, असे मला वाटते. जेव्हा बॉम्ब टाकले जातील, तेव्हा ते पाहू शकतील. त्यानंतर त्यांना तिथेच सोडावे, जेणेकरून ते हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोजून परत येऊ शकतील.''
व्ही. के. सिंह यांनी याआघाडीही एअरस्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विरोधी पक्षनेते, प्रसारमाध्यमे आणि विद्यार्थी नेत्यांवर टीका केली होती. सध्याची परिस्थिती पाहता देशांतर्गत भागातही एक सर्जिकल स्ट्राइक होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. '' दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताने इस्राइलचे अनुकरण केले पाहिजे, असे देशातील जनतेला वाटते. मात्र असे विरोधी पक्ष असतील तर ते होणार नाही. इस्राइलमधील विरोधी पक्ष आपल्या सैन्यावर संशय घेत नाही. तसेच त्यांना अपमानितही करत नाही. जेव्हा लष्कराकडून ऑपरेशन म्युनिकसारख्या कारवाई केली जाते, तेव्हा तिच्यावर शंका घेतली जात नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले.