Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 07:45 IST2023-06-27T07:44:33+5:302023-06-27T07:45:01+5:30
Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला.

Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा
जम्मू : भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला.
जम्मू विद्यापीठात आयोजित सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी सरकारच्या काळात देशाने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केल्याचे सांगत त्यांनी २०१६च्या सीमेपलीकडील सर्जिकल स्ट्राईक व २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ल्याचा संदर्भ दिला. भारत पूर्वीसारखा राहिला नाही. तो अधिक शक्तिशाली होत आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
‘सर्जिकल स्ट्राईक’चानिर्णय केवळ दहा मिनिटांत
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने दहशतवादाविरोधात प्रभावी कारवाई सुरू केली आणि पहिल्यांदाच देशालाच नव्हे तर जगालाही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा अर्थ काय आहे हे कळले,’ असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अवघ्या १० मिनिटांचा अवधी घेतला, असेही ते म्हणाले. यावरून त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दिसून येते.
आमच्या सैन्याने केवळ या बाजूने दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केले नाही, तर त्यांचा खात्मा करण्यासाठी ते सीमेपलीकडेही गेले, असे ते म्हणाले. तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (वृत्तसंस्था)
‘भारताचे बोलणे जग लक्षपूर्वक ऐकते’
n पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे. आज भारत बोलतो तेव्हा जग लक्षपूर्वक ऐकते, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, असे सिंह यावेळी म्हणाले.
n सिंह यांचे हे वक्तव्य पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे.
n या दौऱ्यांत अनेक ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. मोदींच्या वाढत्या विश्वासार्हतेचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की, एका देशाचे पंतप्रधान त्यांना ‘बॉस’ म्हणतात, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, मोदी इतके लोकप्रिय आहेत की लोक त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेऊ इच्छितात.