"माज-अहंकार फार टिकत नाही, इतिहास साक्ष देतो की..."; स्वाति मालिवाल यांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:49 IST2025-02-08T16:48:35+5:302025-02-08T16:49:07+5:30
Swati Maliwal slams Arvind Kejriwal on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025: सोशल मीडियावर द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा फोटो शेअर अरविंद केजरीवाल यांच्यावर साधला निशाणा

"माज-अहंकार फार टिकत नाही, इतिहास साक्ष देतो की..."; स्वाति मालिवाल यांची जहरी टीका
Swati Maliwal slams Arvind Kejriwal on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्तास्थापना केली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचा मुख्यमंत्री बसला. याचीच पुनरावृत्ती दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाली. गेली २७ वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाने अखेर दिल्ली जिंकली आणि आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला. ७० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने बहुमतापेक्षाही खूप मोठी झेप घेत साऱ्यांनाच अवाक् केले. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा धक्का बसला. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. आपचे अनेक बडे दिग्गज नेते पराभूत झाले. दारूण पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
"माज आणि अंहकार कुणाचाही जास्त काळ टिकू शकत नाही. रावणाचाही अहंकार जास्त काळ टिकला नाही, हे तर केवळ अरविंद केजरीवाल आहेत. इतिहास साक्ष आहे की जेव्हा एखाद्या महिलेशी कुणी वाईट वर्तणूक केली असेल तर देवाने त्यांना शिक्षा दिली आहे. आज दिल्ली एका अर्थाने कचऱ्याच्या डब्ब्याप्रमाणे झालीय. दिल्लीच्या रस्त्यांवर कचरा पडलेला दिसतोय. लोकांना काही ठिकाणी घाणेरडे पाणी दिलंय जातंय किंवा काही ठिकाणी पाणीच मिळत नाहीये. नाले तुंडूब भरून वाहताना दिसतायत. हवेचे प्रदुषणदेखील प्रचंड वाढलेलं आहे. यमुना नदी स्वच्छ झालेली नाहीये. दिल्लीकर या सर्व समस्यांना कंटाळले होते, त्यामुळे त्यांनी आप आणि केजरीवाल यांच्या विरोधात मतदान केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अरविंद केजरीवाल स्वत:च्या मतदारसंघातील पराभवदेखील रोखू शकले नाहीत," अशा शब्दांत स्वाति मालीवाल यांनी आप व केजरीवाल यांच्या पराभवावर भाष्य केले.
तसेच, निवडणुकीचे कल हाती येऊ लागले असतानाच त्यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्टदेखील केली होती. त्यांनी महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंग दाखवणारं एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. या पोस्टच्या माध्यमातून स्वाति मालिवाल यांनी हेच सुचवलं होतं की, इतिहासातदेखील महिलेशी वाईट वर्तणूक करणाऱ्यांचे गर्वहरण झाले होतं. यावेळीही दिल्ली निवडणुकीत तेच झालंय.
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) February 8, 2025
दरम्यान, आपचे दोन दिग्गज पराभूत झाले. भाजपाच्या प्रवेश साहिब सिंग वर्मा यांनी अरविंद केजरीवालांना ३,१८६ मतांनी पराभूत केले. तर मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. भाजपाचे तरविंदर सिंग मारवा यांनी ६०० हून जास्त मतांनी विजय मिळवला.