भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद ‘सिग्नल’; संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:43 IST2025-02-10T09:42:52+5:302025-02-10T09:43:24+5:30
‘हे संशयास्पद रेडिओ सिग्नल मध्यरात्रीनंतर ०१:०० ते ०३:०० वाजेदरम्यान पकडले गेले. जानेवारीच्या मध्यभागी गंगासागर मेळ्यादरम्यानही, अनेक संशयास्पद सिग्नल मिळाले होते.

भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद ‘सिग्नल’; संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली
कोलकाता : हॅम रेडिओ ऑपरेटरला गेल्या दोन महिन्यांत दक्षिण बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर बंगाली, उर्दू आणि अरबी भाषांतील संशयास्पद सिग्नल आढळले असून, यामुळे संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
बांगलादेशात सुरू असलेली अशांतता आणि वाढत्या भारतविरोधी वक्तव्यांदरम्यान हे सिग्नल समोर आले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये प्रथमच उत्तर २४ परगणामधील बशीरहाट आणि बोनगाव, तसेच दक्षिण २४ परगणामधील सुंदरबनमध्ये बंगाली, अरबी आणि उर्दू भाषांतील हा संवाद आढळून आला.
पश्चिम बंगाल रेडिओ क्लबचे सचिव अंबरीश नाग बिस्वास यांनी सांगितले की, ‘हे संशयास्पद रेडिओ सिग्नल मध्यरात्रीनंतर ०१:०० ते ०३:०० वाजेदरम्यान पकडले गेले. जानेवारीच्या मध्यभागी गंगासागर मेळ्यादरम्यानही, अनेक संशयास्पद सिग्नल मिळाले होते.
संबंध तणावपूर्ण
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांची सत्तेवरून हकालपट्टी झाल्यानंतर ढाकामध्ये वाढलेल्या तणावादरम्यान सीमा सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे समोर आला आहे. ५ ऑगस्ट रोजी हसीना यांच्या भारत दौऱ्यापासून दोन्ही शेजारी देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे.
४,०९६ किमी लांबीची सीमा भारत आणि बांगलादेशदरम्यान आहे. त्यापैकी २,२१७ किमी पश्चिम बंगालशी जोडून असून, त्याचा बराचसा भाग खुला आहे.