सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. व्यवसायाने शिक्षक असलेला हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीजवळच्या इंदिरापुरममध्ये आला होता. मात्र, एका संशयास्पद औषधाचे सेवन केल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
मूळचा पश्चिम बंगालचा असलेला ३० वर्षीय रजनीश हा तरुण शिक्षक म्हणून कार्यरत होता. नवीन वर्षाचे निमित्त साधून तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गाझियाबादला आला होता. २ जानेवारी रोजी हे दोघेही अभयखंड-२ मधील इम्पीरियो हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलच्या रूम नंबर १०७ मध्ये ते वास्तव्यास होते. हॉटेल स्टाफच्या म्हणण्यानुसार, दोघेही सामान्य दिसत होते आणि त्यांच्यात कोणतेही वाद दिसत नव्हते.
औषध खाल्लं अन् छातीत कळा आल्या!
खोलीत असताना रजनीशने एका औषधाचे सेवन केले. त्यानंतर काही वेळातच त्याला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रकृती वेगाने बिघडल्याने काही समजण्याच्या आतच रजनीशची प्राणज्योत मालवली. हॉटेलमधील हालचाल थांबल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रजनीश बेशुद्ध अवस्थेत आढळला. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
हार्ट अटॅक की रिअॅक्शन?
पोलिसांना संशय इंदिरापुरम पोलीस ठाण्याचे प्रभारी रवी कुमार यांनी सांगितले की, "मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने किंवा औषधाच्या चुकीच्या परिणामामुळे झाल्याचा संशय आहे. रजनीशने नेमके कोणते औषध घेतले होते आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले होते का, याचा तपास आम्ही करत आहोत."
गर्लफ्रेंडची चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज
या घटनेनंतर पोलिसांनी रजनीशच्या प्रेयसीची कसून चौकशी केली आहे. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहेत. अद्याप कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचे पुरावे मिळालेले नाहीत, मात्र पोलीस सर्व बाजू पडताळून पाहत आहेत. रजनीशच्या कुटुंबियांना बंगालमध्ये माहिती देण्यात आली असून, ते गाझियाबादला पोहोचल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने रजनीशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्या रहस्यमयी औषधाबाबत आता पोलीस सखोल तपास करत आहेत.
Web Summary : A 30-year-old man died suspiciously in a Ghaziabad hotel room after reportedly taking medication. Police investigate possible heart attack or drug reaction. Girlfriend questioned.
Web Summary : गाजियाबाद के एक होटल में 30 वर्षीय युवक की संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई। कथित तौर पर दवा लेने के बाद युवक की हालत बिगड़ी। पुलिस जांच कर रही है।