लोकसभेत आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:50 PM2023-12-19T12:50:19+5:302023-12-19T13:01:40+5:30

सरकारविरोधात आक्रमक झालेल्या ४९ लोकसभा खासदारांचं आज निलंबन करण्यात आलं आहे.

Suspension of 49 MPs again in Lok Sabha Including Supriya Sule and Amol Kolhe | लोकसभेत आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश!

लोकसभेत आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश!

नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज पुन्हा ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी चार तरुण लोकसभा सभागृहात घुसल्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या मुद्द्यावरूनच लोकसभा आणि राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. सुरक्षेच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक झालेल्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरू असून आतापर्यंत जवळपास १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

लोकसभेतून आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावश आहे. तसंच शशी थरूर, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम यांच्यासह एकूण ४९ खासदारांना हिवाळी अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्यात आलं आहे. खासदारांचं निलंबन करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून सकाळपासून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह विविध खासदार संसद परिसरात सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.

खासदारांच्या निलंबनाचा काल विक्रम

खासदारांच्या निलंबनात इतिहास रचत नव्या संसदेने काल एकाच दिवशी लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४५ खासदारांना निलंबित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत कठोर नियमांचे पालन करण्याबाबत भाष्य केले होते. या निलंबनाकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वीही १४ खासदारांना निलंबित केले होते.

संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून सोमवारीही संसदेत मोठा गदारोळ झाला होता. कामकाज सुरू होताच लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली हाेती. 

Read in English

Web Title: Suspension of 49 MPs again in Lok Sabha Including Supriya Sule and Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.