मराठी माणसाने क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप का करता? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:44 IST2025-09-10T17:36:57+5:302025-09-10T17:44:36+5:30
सुप्रिया सुळे यांनी उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगवरुन भाजपवर टीका केली

मराठी माणसाने क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप का करता? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule on Vice President Election: सीपी राधाकृष्णन यांची देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले राधाकृष्णन यांनी मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. एनडीएचे उमेदवार असणाऱ्या सीपी राधाकृष्णन यांना एकूण ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली, तर विरोधी उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले. मात्र या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याने इंडिया आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण विरोधी इंडिया आघाडीला खरा धक्का त्यांची स्वतःची मते कमी झाल्यामुळे बसला. इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना फक्त ३०० मते मिळाली. मात्र त्यांच्याकडे किमान ३१५ मते होती. इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, रेड्डी यांना ३१५ ते ३२४ मते मिळतील अशी विरोधी पक्षाच्या नेत्यांना अपेक्षा होती. पण निकाल लागल्यानंतर १५ मते एनडीएकडे गेली.
भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की झारखंड आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील विरोधी खासदारांनी राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले. विरोधी गटातील फूट पडल्यामुळे हा अतिरिक्त पाठिंबा मिळाल्याचा दावा एनडीएने केला. मात्र आम आदमी पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता सुप्रिया सुळे यांनीही क्रॉस व्होटिंगवरुन भाजपला सुनावलं आहे.
"उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत १४ क्रॉस व्होटिंग झाल्याचे भाजपचे म्हणणं आहे. हे १४ लोक कोण आहेत? यासाठी तुम्ही महाराष्ट्राची का बदनामी करता? काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सगळ्या खासदारांनी मतदान केलं. मग क्रॉस व्होटिंग महाराष्ट्राने किंवा मराठी माणसाने केले हा आरोप आमच्यावर कशासाठी करता? तुमचं राजकारण करायचं आहे ते ठीक आहे. पण महाराष्ट्राची तर बदनामी करु नका. महाविकास आघाडीची १४ मते फुटली यांना कसं माहिती. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
"आम्ही मतदान करताना आमच्यासाठी काही मार्किंग लावलं होतं का? याला व्होट चोरी म्हणतात. या निवडणुकीमध्ये व्हिप नाहीये. हे गुप्त मतदान आहे. त्यामुळे कोणाला मतदान केलं हे फक्त आम्हालाच माहिती आहे. मग हे आमची मते फुटली असा कसा आरोप करतात. याच्यावर मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.