मतदारयाद्यांच्या मसुद्याचे प्रकाशन थांबविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:51 IST2025-07-29T11:51:44+5:302025-07-29T11:51:44+5:30
बिहारच्या मतदारयाद्यांशी संबंधित मुद्द्यावरून सोमवारी पुन्हा राज्यसभेत गोंधळ झाला.

मतदारयाद्यांच्या मसुद्याचे प्रकाशन थांबविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या मसुद्याचे प्रकाशन थांबविण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या राज्यात निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाविरुद्ध दाखल याचिकांवर कायमस्वरूपी अंतिम निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. सूर्यकांत व न्या. जॉयमाल्या बागची यांच्या न्यायपीठाने अंतिम सुनावणीसाठी वेळापत्रक २९ जुलै रोजी निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले.
आधार, मतदार ओळखपत्र योग्यच
सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाने मतदारांच्या पडताळणीसाठी आधार व निवडणूक ओळखपत्र स्वीकारणे चालू ठेवावे, असेही न्यायालयाने आयोगाला सांगितले. हे दोन्ही दस्तावेज विश्वासार्हतेच्या दृष्टीने योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
बिहारवरून राज्यसभेत पुन्हा गोंधळ
बिहारच्या मतदारयाद्यांशी संबंधित मुद्द्यावरून सोमवारी पुन्हा राज्यसभेत गोंधळ झाला. विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनासह इतर मुद्द्यांवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. यादरम्यान कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. दुपारी कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.