श्रीकृष्णजन्मभूमी वाद; हायकोर्टात सुनावणी सुरू राहील, हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 04:07 PM2024-04-15T16:07:09+5:302024-04-15T16:10:14+5:30

Shri Krishna Janmabhoomi Case In Supreme Court: अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली होती.

supreme court refuse petition to interfere in shri krishna janmabhoomi shahi idgah case | श्रीकृष्णजन्मभूमी वाद; हायकोर्टात सुनावणी सुरू राहील, हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार

श्रीकृष्णजन्मभूमी वाद; हायकोर्टात सुनावणी सुरू राहील, हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार

Shri Krishna Janmabhoomi Case In Supreme Court: एकीकडे ज्ञानवापीतील व्यास तळघरात सुरू असलेल्या पूजेवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असताना दुसरीकडे श्रीकृष्णजन्मभूमी वादाप्रकरणी दाखल याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयात या याचिकांवरील सुनावणी सुरू राहील, असे सर्वोच्च न्यायालाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शाही ईदगाह मुस्लिम पक्षकारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित असलेले १५ खटले सुनावणीसाठी उच्च न्यायालयात हस्तांतरित केले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाकडून मुस्लिम पक्षकारांना दिलासा मिळाला नाही. मुस्लिम पक्षकारांची मागणी फेटाळून लावत उच्च न्यायालयात सुनावणी सुरूच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाहशी संबंधित अनेक याचिकांवर एकाच वेळी सुनावणी सुरू आहे. केशव मंदिराच्या १३.३७ एकर जागेवर मशीद बांधण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. हिंदू पक्षकारांकडून दाखल केलेल्या याचिका कायम ठेवण्यायोग्य नाहीत, असा दावा मुस्लिम पक्षकारांनी केला आहे. सन १९६८ मध्ये झालेल्या एका करारावरून मुस्लिम पक्षकारांनी यासंदर्भात दावे केले आहेत. या करारात म्हटले आहे की, केशव देव कटरा यांची जमीन शाही ईदगाह मशिदीला देण्यात आली आहे. यासोबतच मुस्लिम पक्षकारांनी प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, लिमिटेशन अ‍ॅक्ट, वक्फ अ‍ॅक्ट आणि स्पेशल रिलीफ अ‍ॅक्ट यांचाही हवाला दिला आहे.
 

Web Title: supreme court refuse petition to interfere in shri krishna janmabhoomi shahi idgah case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.