चौकशीला हजर राहिलात, आता कशामुळे आक्षेप? न्या. वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:13 IST2025-07-29T10:13:04+5:302025-07-29T10:13:49+5:30
या प्रकरणात सुनावणी सुरू आहे.

चौकशीला हजर राहिलात, आता कशामुळे आक्षेप? न्या. वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘चौकशीच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर आता तुम्ही अहवालाबाबत प्रश्न कसे उपस्थित करू शकता?’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी न्या. यशवंत वर्मा यांना सुनावले.
निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्याच्या प्रकरणात अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालास न्या. वर्मा यांनी या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या प्रकरणात सुनावणी सुरू आहे.
अहवालाची वाट का पाहिली ?
न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. ए. जी. मसीह यांनी याचिकेवर सुनावणी करताना हा तपास पूर्ण होऊन अहवाल येईपर्यंत वाट का पाहिली, अशी विचारणा
न्या. वर्मा यांच्या वतीने उपस्थित ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांना केली.
समितीसमोर हजर होणे हा विरोधात पुरावा कसा? सिब्बल यांचा युक्तिवाद
चौकशी समितीसमोर हजर होणे हा विरोधात पुरावा ठरू शकत नाही. नोटा कुणाच्या आहेत हा तपास समिती करेल, या भावनेतून समितीसमोर ते उपस्थित राहिले. घटनात्मक तरतुदींनुसार उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर व्हिडीओ अपलोड करणे, सार्वजनिक टिपणी करणे किंवा माध्यमांद्वारे न्यायाधीशांवर आरोप करण्यावर निर्बंध आहेत.
न्यायालयाने हे प्रश्न केले उपस्थित
‘न्या. वर्मा चौकशी समितीसमोर हजर का झाले ? चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत वाट का पाहिली ? समिती आपल्या बाजूने अहवाल देईल या विचाराने तुम्ही चौकशीला सामोरे गेला होतात का?, अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली.