ठाकरे गटाकडून ‘मशाल’ चिन्हही जाणार? सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी; समता पक्षाची याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:51 IST2023-07-17T16:50:44+5:302023-07-17T16:51:35+5:30
Thackeray Group Mashal Party Symbol: ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला असून, यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली.

ठाकरे गटाकडून ‘मशाल’ चिन्हही जाणार? सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी; समता पक्षाची याचिका
Thackeray Group Mashal Party Symbol: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना पाहायला मिळत नाहीत. अलीकडेच ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिल्यावर ठाकरे गटाकडे मशाल चिन्ह राहिले. मात्र, या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. समता पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते. मात्र, समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने समता पक्षाची याचिका फेटाळली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाबाबत पुढील सुनावणी कधी?
सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्र नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता मशाल चिन्हाच्या याचिकेवर ६ आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिल होते.
ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षचिन्हाबाबत दावा केला होता. यावर सुनावणी घेऊन पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला गटाला देण्यात आले होते. मात्र, यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या संदर्भात ३१ जूलैला सुनावणी पार पडणार आहे.