Lawyer Siddharth Shinde Death: सर्वोच्च न्यायालयातवकिली करणारे आणि सोप्या भाषेत न्यायालयातील सुनावणीचे विश्लेषण करणारी वकील म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ शिंदे यांचे निधन झाले. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ४८ वर्षांचे होते.
सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. ते मूळचे श्रीरामपूर येथील असून, नंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शिंदे हे सोमवारी (१५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे कामासाठी न्यायालयात गेले होते. तिथे कामात व्यस्त असतानाच त्यांना चक्कर आली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण ह्रदयक्रिया बंद पडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
सिद्धार्थ शिंदे यांचे पार्थिव दिल्लीवरून पुण्यात आणले जाणार आहे. पुण्यातील निवासस्थानी पार्थिव ठेवल्यानंतर दुपारी त्यांच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सहज सोप्या भाषेत कायद्याचे विश्लेषण
सिद्धार्थ शिंदे हे वकिली करण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकरणातील सुनावण्याचे विश्लेषण करायचे. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत ते कायदा समजून सांगायचे. सोप्या भाषेत कायदा समजावून सांगणारे म्हणूनही त्यांची ओळख झाली होती.