ब्रेकअपनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हायला नको; सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:03 IST2025-04-03T12:03:04+5:302025-04-03T12:03:45+5:30
कोर्टात एका व्यक्तीने त्याच्यावरील बलात्काराचे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे मत व्यक्त केले.

ब्रेकअपनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हायला नको; सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली - अलीकडच्या काळात लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केलेल्या वाढत्या प्रकरणांवर सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे. जे नाते लग्नापर्यंत पोहचत नाही, त्यात अशाप्रकारे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे चुकीचे आहे. नातेसंबंधात राहणे हे गुन्ह्यासारखे झाले आहे. एखाद्याशी ब्रेकअप झालं त्याचा अर्थ बलात्कार झाला असं होत नाही. प्रेम संबंध बिघडणे, वेगळे राहणे त्यानंतर बलात्काराचा गुन्हा करायला नको असं सुप्रीम कोर्टाच्या न्या.एमएम सुंदरेश आणि न्या. राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे.
कोर्टात एका व्यक्तीने त्याच्यावरील बलात्काराचे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच्या जोडीदार महिलेने आरोप केला होता की, लग्नाचे आमिष दाखवून त्याने मला शारीरिक संबंध ठेवण्यास मजबूर केले. वरिष्ठ वकील माधवी दीवान यांनी पीडितेची बाजू कोर्टात मांडली. त्यावर कोर्टाने म्हटलं की, पीडितेने इतकी सीनिअर वकील नियुक्त केली आहे त्यामुळे ती निष्पाप आहे असं मानलं नाही जाऊ शकत. तुम्ही वयस्क आहात. त्यामुळे तुम्हाला फसवून लग्नाचं वचन देऊन विश्वास संपादन केला गेला असं सांगू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच रोमान्स संपला अथवा ब्रेकअप झाला याचा अर्थ बलात्काराचा गुन्हा झाला असं नाही. समाज ज्यारितीने बदलत चालला आहे त्यातून आपल्याला समजायला हवं रिलेशनशिप तुटणे म्हणजे रेपचा गुन्हा बनायला नको. आज नैतिकता आणि मूल्ये बदलली आहेत. विशेषत: युवा पिढी बदलत आहे. जर आम्ही हे मान्य केले तर कॉलेजमध्ये मुला-मुलींमधील नातेसंबंध दंडनीय होतील. समजा, कॉलेजमधील २ विद्यार्थ्यांचे प्रेम असेल. मुलाने मुलीला मी तुझ्याशी लग्न करतो असं म्हटलं, त्यानंतर त्याने केले नाही तर तेदेखील गुन्हा मानला जाईल का असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले.
दरम्यान, हे प्रकरण अँरेंज मॅरेजचं आहे. युवतीला वाटले जर तिने साथीदाराला खुश केले नाही तर तो तिच्याशी लग्न करणार नाही. या दोघांचा साखरपुडा झाला होता. युवकासाठी हे कॅज्युअल सेक्स असेल परंतु मुलीसाठी ते तसं नव्हते असं पीडितेच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला. त्यावर सुप्रीम कोर्ट सहमत झाले नाही. केवळ लग्न न होणे म्हणजे बलात्कार मानला जाईल का असा सवाल कोर्टाने विचारला. आम्ही एकाच दृष्टीकोनातून हे पाहू शकत नाही. आमचीही मुलगी आहे. जर तीदेखील या परिस्थितीत असती तरीही व्यापकदृष्टीने आम्ही याकडे पाहिले असते. तक्रारदार महिलेला हे नाते संपू शकते हे माहिती असतानाही तिने संबंध ठेवले असं कोर्टाने म्हटलं. त्यानंतर या प्रकरणावर पुढील तारीख दिली.