EVM मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:15 IST2025-02-11T18:15:10+5:302025-02-11T18:15:24+5:30
या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

EVM मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
Supreme Court Orders Election Commission of India: देशातील कुठल्याही निवडणुकीनंतर EVM चा मुद्दा उपस्थित केला जातो. अशातच, ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी(11 फेब्रुवारी) सुनावणी झाली. या याचिकेत निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या मेमरी/मायक्रोकंट्रोलरची चाचणी आणि पडताळणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली आहे. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून (ECI) उत्तर मागितले असून, सध्या EVM मधून कोणताही डेटा हटवू नका किंवा कोणताही डेटा रि-लोड करू नका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या या याचिकेत, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ईव्हीएमची मेमरी तपासण्यासाठी स्पष्ट प्रोटोकॉल तयार करण्यास सांगावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.
Supreme Court hears the plea by Association of Democratic Reforms
— Bar and Bench (@barandbench) February 11, 2025
CJI Sanjiv Khanna: what is this for ?
Adv Prashant Bhushan: we are Seeking that the procedure which ECI needs to adopt as per supreme Court judgment is in consonance with their standard operating protocol. What… pic.twitter.com/wnsqkybSLX
एडीआरच्या याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये (एसओपी) फक्त ईव्हीएम आणि मॉक पोलच्या मूलभूत तपासणीच्या सूचना आहेत. जळालेल्या मेमरीच्या तपासाबाबत आयोगाने अद्याप प्रोटोकॉल तयार केलेला नाही. ईव्हीएमचे चारही भाग, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपीएटी आणि चिन्ह लोडिंग युनिटचे मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी प्रोटोकॉल लागू करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा हवाला दिला आहे. या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची जुनी पद्धत पूर्ववत करण्यास नकार दिला होता. याशिवाय सर्व VVPAT स्लिप मोजण्याची मागणीही फेटाळण्यात आली. परंतु चांगल्या पारदर्शकतेसाठी न्यायालयाने निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आत ईव्हीएमची जळालेली मेमरी तपासण्याची परवानगी दिली होती.
26 मार्च 2024 रोजी दिलेल्या या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार निकाल जाहीर झाल्यापासून आठवडाभरात पुन्हा पडताळणीची मागणी करू शकतात. अशा परिस्थितीत, अभियंत्यांची टीम कोणत्याही 5 मायक्रो कंट्रोलरची बर्न मेमरी तपासेल. या तपासणीचा खर्च उमेदवाराला करावा लागणार आहे. अनियमितता सिद्ध झाल्यास उमेदवाराला पैसे परत मिळतील.