सुनावणीदरम्यान वकिलाने सुप्रीम कोर्टात आणल्या व्हिस्कीच्या बाटल्या; जस्टिस चंद्रचूड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 02:41 PM2024-01-07T14:41:19+5:302024-01-07T14:42:00+5:30

कोर्टात व्हिस्कीच्या बाटल्या पाहून सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड चकीत झाले.

Supreme Court Chief Justice: whiskey-bottles-displayed-before-chief-justice-in-supreme-court-hearing | सुनावणीदरम्यान वकिलाने सुप्रीम कोर्टात आणल्या व्हिस्कीच्या बाटल्या; जस्टिस चंद्रचूड म्हणाले...

सुनावणीदरम्यान वकिलाने सुप्रीम कोर्टात आणल्या व्हिस्कीच्या बाटल्या; जस्टिस चंद्रचूड म्हणाले...

Supreme Court Chief Justice: आपल्या निर्णयांमुळे आणि टिप्पण्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान चकीत झाले. शुक्रवारी (5 जानेवारी) दोन मद्य कंपन्यांमधील ट्रेडमार्क उल्लंघन प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी वकील मुकुल रोहतगी चक्क सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बाटल्या घेऊन आले.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील अपीलावर सुनावणी सुरू होती. इंदूरस्थित कंपनी जेके एंटरप्रायझेसला 'लंडन प्राईड' नावाने शीतपेय तयार करण्यापासून रोखण्यासाठी मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डचे अपील मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळले होते. या निर्णयाविरोधात पेर्नोड कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बाटली पाहून सीजेआय हसले
या प्रकरणी सुनावणी सुरू होताच पेर्नोड कंपनीचे वकील मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला विनंती केली की, कंपनीचे उत्पादन कोर्टात आणण्याची परवानगी द्यावी. परवानगी मिळताच त्यांनी कंपनीच्या दोन मद्य बाटल्या आणून टेबलावर ठेवल्या. हे असामान्य दृश्य पाहून न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्यासह सरन्यायाधीश चंद्रचूड मोठ्याने हसले. दोन उत्पादनांमधील साम्य दाखवण्यासाठी बाटल्या आणल्याचे रोहतगी यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने हा निर्णय दिला
हे ऐकून सरन्यायाधीश म्हणाले, "येथे मुद्दा ट्रेड ड्रेसचा आहे. बॉम्बेमधील माझ्या एका निर्णयात या पैलूचा अंतर्भाव करण्यात आला आहे, ज्यामध्ये बाटलीच्या आकाराचा समावेश होता." रोहतगी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने नोटीस बजावली आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ​​दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली. नोटीस बजावल्यानंतर रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना विचारले की, ते बाटल्या सोबत घेऊन जाऊ शकतात का? सरन्यायाधीश हसले आणि म्हणाले, हो जरूर.

काय आहे हा संपूर्ण वाद?
गेल्या वर्षी मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डने इंदूरस्थित जेके एंटरप्रायझेसला 'लंडन प्राइड' ट्रेडमार्क अंतर्गत अल्कोहोलयुक्त पेये तयार करण्यापासून रोखण्याचे आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पेर्नोर्ड रिकार्डने जेके एंटरप्रायजेसवर 'लंडन प्राइड' चिन्ह वापरून ग्राहकांना फसवल्याचा आरोप केला होता. पण, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. आता सुप्रीम कोर्टात याची सुनावणी सुरू आहे.

Web Title: Supreme Court Chief Justice: whiskey-bottles-displayed-before-chief-justice-in-supreme-court-hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.