कुंभ मेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, पण...; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:00 IST2025-01-07T13:59:39+5:302025-01-07T14:00:45+5:30
ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते."

कुंभ मेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, पण...; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर मोठा आरोप
कुंभ मेळ्याची तयारी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार गंगासागर यात्रेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्र सरकार कुंभ मेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, गंगासागर तीर्थाकडे दुर्लक्ष करत आहे, असे ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे. गंगासागरला दरवर्षी एक कोटीहून अधिक यात्रेकरू भेट देतात, असा दावा करत ममता यांनी सोमवारी केंद्राकडे गंगासागर यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते." त्या पुढे म्हणाल्या, "कुंभमेळ्याला अनेक मार्गांनी लोक जाऊ शकतात, मात्र, गंगासागर येत्रेसाठी संबंधित बेटापर्यंत पोहोचणे अवघड काम आहे. यात्रेकरूंना समुद्र बेटावर सहज पोहोचता यावे यासाठी पूल बांधण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे."
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हे ठिकाण पुलाने जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी एकदा केंद्र सरकारशी बोलले होते. संबंधित मंत्र्यांनी पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. मी तीन ते चार वर्षे वाट बघितली. मात्र, त्यांनी काहीच केले नाही. आता राज्य सरकार स्वखर्चाने हा पूल बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पुलाला पूर्ण होण्यासाठी सुमारे 1,500 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. गंगासागर जत्रेसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यात आल्या असून एक हेलिपॅडही तयार करण्यात आले आहे," असेही ममता यावेळी म्हणाल्या.