सुनंदा पुष्कर यांचा खूनच
By Admin | Updated: January 7, 2015 02:40 IST2015-01-07T02:40:47+5:302015-01-07T02:40:47+5:30
माजी केंद्रीय मंत्री आणि काँगे्रस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनंदा पुष्कर यांचा खूनच
हत्येचा गुन्हा : विषप्रयोग झाल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँगे्रस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय बोर्डाच्या अंतिम अहवालाच्या आधारावर खुद्द दिल्ली पोलीस आयुक्त भीमसेन बस्सी यांनीच दिलेल्या या खळबळजनक माहितीमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे़ याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हाही दाखल केला असला, तरी संशयित म्हणून अद्याप कुणाचेही नाव समोर आलेले नाही़ या नव्या कलाटणीनंतर थरूर यांची नव्याने चौकशी होण्याची चिन्हे आहेत.
सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला होता, असा अंतिम वैद्यकीय अहवाल वैद्यकीय बोर्डाने सोपवला असल्याचे बस्सी यांनी मंगळवारी पत्र परिषदेत सांगितले़ अर्थात त्यांनी स्वत: विष घेतले की त्यांना कुणी बळजबरीने विष दिले, हे अद्याप सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़
हत्येच्या तपासासाठी विशेष टीम
सुनंदा यांच्या हत्येच्या तपासासाठी एक विशेष पथक गठित करण्यात आले आहे़ सुनंदा यांचे नमुने तपासणीसाठी विदेशात पाठवले जातील, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली़ सुनंदा यांचा मृत्यू औषधांच्या ज्यादा मात्रेने झाल्याचे व्हिसेरा अहवालात म्हटले होते़ आता त्यांचा मृत्यू विषाने झाला, जे तोंडावाटे वा इंजेक्शनद्वारे दिले गेलेले असावे, असा तर्क आहे.
थरूरांच्या अडचणी वाढणार
हत्येचा गुन्हा दाखल केला, हे ऐकून मी सुन्न झालो असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, हीच माझी इच्छा आहे आणि पोलिसांना माझे पूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र ताज्या वैद्यकीय अहवालानंतर शशी थरूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे़
१७ जानेवारी २०१४ रोजी चाणक्यपुरीस्थित लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलच्या खोली क्रमांक ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता़ यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते़