सुनंदा यांची हत्या माझ्यासाठी धक्कादायक - शशी थरुर
By Admin | Updated: January 6, 2015 18:21 IST2015-01-06T18:20:57+5:302015-01-06T18:21:54+5:30
सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचे समोर येणे हे माझ्यासाठी धक्कादायक असून या गुन्ह्याच्या तपासात मी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करीन अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते शशी थरुर यांनी दिली आहे.

सुनंदा यांची हत्या माझ्यासाठी धक्कादायक - शशी थरुर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.६ - सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचे समोर येणे हे माझ्यासाठी धक्कादायक असून या गुन्ह्याच्या तपासात मी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करीन अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी दिली आहे.
मंगळवारी दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाली होती असे स्पष्ट केले आहे. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यापार्श्वभूमीवर थरुर यांनी त्यांची भूमिका मांडली. दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा दाखल केल्याचे वृत्त ऐकून मला धक्काच बसला आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा आणि सत्य परिस्थिती सर्वांसमोर यावी अशी मागणीही थरुर यांनी केली. पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणातील पोस्ट मार्टम रिपोर्ट आणि तपासातील अन्य महत्त्वाची कागदपत्र पोलिसांनी आम्हाला दिलेले नाही असेही त्यांनी सांगितले.