महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:19 IST2025-09-18T10:17:05+5:302025-09-18T10:19:59+5:30
डोंगराचा भला मोठा कडाच बद्रीनाथ महामाार्गावर कोसळला. ही घटना घडली तेव्हा भाजपचे खासदार तिथेच होते. त्यांनी याचा व्हिडीओ शेअर केला.

महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
उत्तराखंडमध्ये निसर्गाचा भयंकर प्रकोप बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, अशीच एक घटना बद्रीनाथ महामार्गावर घडली. भाजपचे गढवालचे खासदार अनिल बलुनी भूस्खलनातील पीडितांच्या भेटीसाठी निघालेले असताना मोठी दरड कोसळली. यावेळी खासदार बलुनी सगळ्यांना पाठीमागे जाण्याच्या सूचना देत होते. त्याचवेळी आणखी दरड कोसळली. घाबरलेले खासदार बलुनीही जीव वाचवण्यासाठी धावत सुटले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडल्या असून, खासदार अनिल बलुनी नुकसान झालेल्या भागांना भेटी देत आहेत. भाजपचे मीडिया प्रमुख आणि गढवालचे खासदार असलेले बलुनी चमोली, रुद्रप्रयागमधील दुर्घटना झालेल्या भागांचा दौरा करून परत येत होते. त्याचवेळी ही घटना घडली.
बुधवारी सांयकाळी देवप्रयाग जवळ बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठी दरड कोसळली. प्रसंगावधान राखत वाहने थांबवल्याने मोठी जीवितहानी टळली.
अनिल बलुनी यांनी शेअर केलेला व्हिडीओ
उत्तराखंड में इस वर्ष आई भीषण अतिवृष्टि और भूस्खलन ने इतने गहरे घाव दिए हैं, जिन्हें भरने में बहुत समय लगेगा।
— Anil Baluni (@anil_baluni) September 18, 2025
कल शाम आपदा प्रभावित क्षेत्र में भूस्खलन का एक भयावह दृश्य आप सभी के साथ साझा कर रहा हूं। यह दृश्य स्वयं बता रहा है कि हमारा उत्तराखंड इस समय कितनी भीषण प्राकृतिक आपदा… pic.twitter.com/fdTsXpPsm2
खासदार अनिल बलुनी यांनी या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की, "उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनांमुळे खूप मोठ्या जखमा झाल्या आहेत. या जखमा भरण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. काल सायंकाळी नुकसान झालेल्या भागातील भूस्खलनाचे भयंकर दृश्य तुम्हाला दाखवत आहे."
"उत्तराखंड किती भयंकर नैसर्गिक प्रकोपाचा सामना करत आहे, हेच तुम्हाला हे दृश्य सांगत आहे. मी बाबा केदारनाथांकडे सर्व लोकांच्या सुरक्षित आयुष्याची, त्यांचे आरोग्य चांगले रहावे आणि ते आनंदात राहावे अशी प्रार्थना करतो. संकटाच्या या काळात जनसेवा करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान, प्रशासन आणि अडचणींच्या काळातही ढिगारा हटवणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल आदर व्यक्त करतो", असेही ते म्हणाले आहेत.