जिद्द! अपघातामुळे कापावे लागले पाय पण 'तो' खचला नाही; IIT ते Google चा प्रेरणादायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:26 IST2025-03-25T11:26:23+5:302025-03-25T11:26:57+5:30
Naga Naresh : नागा नरेश असं या तरुणाचं नाव असून जर एखाद्या व्यक्तीमध्ये साध्य करण्याची आवड आणि दृढनिश्चय असेल तर तो काहीही करू शकतो हे सिद्ध केलं आहे.

फोटो - nbt
आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो आता गुगल कंपनीत काम करत आहे. नागा नरेश असं या तरुणाचं नाव असून जर एखाद्या व्यक्तीमध्ये साध्य करण्याची आवड आणि दृढनिश्चय असेल तर तो काहीही करू शकतो हे सिद्ध केलं आहे.
नागा नरेश करुतुरा याचा जन्म आंध्र प्रदेशातील टिपारू या छोट्याशा गावात झाला. त्याचे वडील ड्रायव्हर होते आणि आई गृहिणी होती. गरिबीत जीवन जगत असताना नागा नरेशचा अपघात झाला आणि त्याने आपले दोन्ही पाय गमावले. त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यांच्या पालकांकडे पैसे नसल्याने त्याच्यावर उपचार करण्यास नकार देण्याला. त्यानंतर पोलिसांनी त्याला सरकारी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांना त्याचे दोन्ही पाय कापावे लागले.
नागा नरेश सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता पण गरिबीमुळे त्याला शाळा सोडावी लागली. नंतर त्याचे कुटुंब तनुकू येथे गेलं, जिथे त्याला एका मिशनरी शाळेत दाखल करण्यात आलं. शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही तो अभ्यासात चांगली कामगिरी करत राहिला आणि त्याला मित्रांकडूनही चांगला पाठिंबा मिळाला.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागा नरेशने आयआयटी-जेईई परीक्षेची खूप तयारी केली आणि ती उत्तीर्ण केली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत त्याने ९९२ वा रँक मिळवला. शारीरिकदृष्ट्या अपंग श्रेणीत त्याला चौथा रँक मिळाला. जेईई एडव्हान्स्ड उत्तीर्ण झाल्यानंतर, नागा नरेशला बी.टेकसाठी आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळाला.
नागा नरेशची एका ट्रेनमध्ये सुंदर नावाच्या माणसाची भेट झाली ज्याने त्याच्या वसतिगृहाची फी भरली. तसेच ज्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले त्यांनी त्याच्या ट्यूशनची फी भरली. नागा नरेश याला देश आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या आणि त्याने गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ज्वॉईन होण्याचा निर्णय घेतला.