कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:43 IST2025-12-16T14:41:45+5:302025-12-16T14:43:00+5:30
हरियाणाच्या हरदीप गिलने असंख्य अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे.

कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
हरियाणाच्या हरदीप गिलने असंख्य अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे. लहानपणी वडील गेले, आईसोबत शेतात मजुरी केली आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) मध्ये सलग ८ वेळा अपयश आलं पण त्याने हार मानली नाही. सैन्यात जाण्याची जिद्द आणि शेतकरी आईचा संघर्ष यामुळेच हरदीप सैन्यात अधिकारी झाला. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.
हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील उचानाजवळील अलीपूर गावातील रहिवासी हरदीपचं जीवन संघर्ष आणि मेहनतीने भरलेलं आहे. तो फक्त २ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्याची आई संत्रो देवी यांनी हरदीप आणि त्याच्या तीन बहिणींना वाढवलं. पण मुलांच्या संगोपनासाठी खूप कष्ट घेतले. हरदीप गिलच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत केली.
पहाटे लवकर उठून शेतात मजुरी करायच्या आणि दुपारच्या वेळी एका शाळेत मिड-डे मील कर्मचारी म्हणून काम करत असत. त्यांना महिन्याला फक्त ८०० रुपये मिळायचे, ज्यातून कुटुंबाचा खर्च चालायचा. त्यांच्याकडे थोडी शेतजमीन देखील आहे, परंतु त्यातून जास्त उत्पन्न मिळत नव्हते. कशाप्रकारे तरी त्यांनी हरदीपला गावातील शाळेत टाकलं. आर्थिक परिस्थितीमुळे हरदीपला लहान वयातच आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली होती. त्याने आईसोबत शेतात जायला सुरुवात केली. तो दिवसा शेतात काम करायचा आणि दुपारनंतर अभ्यास करायचा.
बारावीनंतर हरदीपला सैन्यात जाण्याचं वेड लागलं. त्याने इंडियन एअर फोर्स (IAF) एअरमनच्या नोकरीसाठी अर्ज केला. परंतु निवड प्रक्रियेदरम्यान छोट्या-छोट्या कमतरतांमुळे त्याची निवड होऊ शकली नाही. तरीही त्याने हार मानली नाही. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, 'मी काही गोष्टी सुधारल्या आणि पुन्हा प्रयत्न केला. जेव्हा एअरमन पदासाठी सुमारे ३००० तरुणांची निवड झाली, तेव्हा मी ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये ५९व्या क्रमांकावर होतो. त्याचवेळी अग्निपथ योजनेमुळे सर्व काही बदललं आणि जॉइनिंग लेटर आलं नाही.'
निराश झालेल्या हरदीपने पुढे IGNOU मधून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, पण तरीही त्याचं एकच ध्येय होतं - सैन्यात जाण्याचं. IGNOU मधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने पुन्हा प्रयत्न केले. त्याने कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षा दिली. हरदीप ९व्या प्रयत्नात सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेत यशस्वी झाला. ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये ५४ वा क्रमांक मिळवून तो IMA मध्ये सहभागी झाला आहे.