विदेशात शिक्षणासाठी न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातच सुविधा देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:12 IST2020-06-21T03:11:18+5:302020-06-21T03:12:27+5:30
विद्यार्थ्यांच्या कमतरतेच्या समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अभियांत्रिकी कॉलेजेसना संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.

विदेशात शिक्षणासाठी न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातच सुविधा देणार
एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी विदेशात शिकण्यासाठी जातात. त्यात विशेषकरून अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन व कॅनडा यांचा समावेश आहे. आता कोरोनाच्या भीतीमुळे विदेशात जाऊ न शकणाºया विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षणांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या कमतरतेच्या समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अभियांत्रिकी कॉलेजेसना संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयात याबाबत नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात आली होती. त्याबाबत एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, जेईई मेन्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख काही काळासाठी वाढविण्यात आली. कोरोनाच्या उद्रेकामुळे विदेशात शिक्षणाची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याच देशात अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून येथील संस्थांमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी ही तरतूद करण्यात आली होती. सध्या जेईई मेन्सच्या परीक्षेसाठी २५ हजार नवीन विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यामुळे एकूण विद्यार्थ्यांची संख्या ८.५० लाखांवर गेली आहे. यामुळे बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही संजीवनी मिळणार आहे. अशा महाविद्यालयांना विद्यार्थी मिळतील व विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयांत शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी विदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणाची संधी देण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ ही योजना सुरू केली होती. भारत सरकारने दरवर्षी यात ५० हजार विदेशी विद्यार्थ्यांना शिकविण्याची ही योजना बनवली होती.
>उच्च गुणवत्तेची विद्यापीठे उघडावी लागतील -पोखरियाल
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ‘लोकमत’बरोबर केलेल्या विशेष बातचीतमध्ये सांगितले की, भारतातील सुमारे ७.५ लाख विद्यार्थी विदेशात शिकतात. अशा विद्यार्थ्यांना तसेच इतर विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च गुणवत्तेची खाजगी व सरकारी विद्यापीठे उघडावी लागतील. ‘स्टडी इन इंडिया’ अंतर्गत विदेशी व देशातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणात उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. पोखरियाल यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या कठीण स्थितीने प्रत्येक क्षेत्रातील लोकांचे जीवन प्रभावित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भूमीत- भारतात- शिक्षण घेण्याची तसेच काम करण्याची इच्छा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेकडे जात आहे.