‘कामगारविषयक कडक सुधारणांमुळे भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला चालना’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 08:35 IST2026-03-28T08:35:29+5:302026-03-28T08:35:29+5:30
लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा य़ांच्याशी संवाद साधताना मांडविया यांनी हे मत व्यक्त केले.

‘कामगारविषयक कडक सुधारणांमुळे भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला चालना’
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील नव्या कामगार कायद्यांमधील बदलांनी केवळ देशाची जागतिक प्रतिमा बळकट झाली नाही, तर भारतीय उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय विक्रीलाही चालना मिळाली आहे, असे केंद्रीय कामगार, रोजगार, युवक व्यवहार व क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा य़ांच्याशी संवाद साधताना मांडविया यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी जेम ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (जीजेइपीसी) अध्यक्ष किरीट भन्साळी हेही उपस्थित होते.
मांडविया यांनी सांगितले की, भारतात बालमजुरीचे प्रमाण जास्त असल्याबाबत परदेशात असलेले गैरसमज कडक आंतरराष्ट्रीय कामगार नियमांच्या अंमलबजावणीमुळे दूर झाले आहेत. या भेटीदरम्यान डॉ. विजय दर्डा यांनी २०२५मध्ये यवतमाळ येथे प्रख्यात रामचरितमानस व्याख्याते मुरारी बापू यांनी सादर केलेल्या रामकथा प्रवचनावर आधारित ‘रामरसायन’ हे कॉफी टेबल पुस्तक व स्वतःचे ‘द चर्न’ हे राज्यसभा कार्यकाळावर आधारित पुस्तक केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना भेट दिले.
२०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची तयारी
क्रीडा विषयावर बोलताना मनसुख मांडविया यांनी सांगितले की, भारत २०३०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी तयारी करत आहे, ज्यासाठी अहमदाबादला अधिकृत यजमान शहर म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या मोठ्या कार्यक्रमासाठी आवश्यक संसाधने उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच क्रीडा मंत्रालय विविध राज्यांमध्ये क्रीडा प्रोत्साहनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, क्रीडाक्षेत्राला राजकारणापासून वेगळे ठेवण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून राजकीय हस्तक्षेप टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.