दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:44 IST2025-10-05T09:42:16+5:302025-10-05T09:44:18+5:30
Delhi Stray Dog Attack news: जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडू आणि प्रशिक्षक दिल्लीत दाखल झाले आहेत. स्पर्धेदरम्यान, केनियाचा धावपटू डेनिस मरागिया (Denis Maragia) हा आपल्या इव्हेंटपूर्वी तयारीसाठी 'कॉल रूम' जवळ असताना एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला

दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
देशाची राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या प्रतिष्ठित जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Para Athletics Championships)साठी जगभरातून खेळाडू, प्रेक्षक आलेले आहेत. परंतू, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशाच्या प्रतिमेला गालबोट लागल्याचा आरोप भाजपाने केला आहे. केनियाचा खेळाडू आणि परदेशी प्रशिक्षकांवर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे स्पर्धेच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडू आणि प्रशिक्षक दिल्लीत दाखल झाले आहेत. स्पर्धेदरम्यान, केनियाचा धावपटू डेनिस मरागिया (Denis Maragia) हा आपल्या इव्हेंटपूर्वी तयारीसाठी 'कॉल रूम' जवळ असताना एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा चावा घेतला. याशिवाय, इतर दोन घटनांमध्ये दोन परदेशी प्रशिक्षकांनाही स्टेडियम परिसरात भटक्या कुत्र्यांनी जखमी केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमींना तातडीने स्टेडियममधील वैद्यकीय कक्षात प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप नेते विजय गोयल म्हणाले, "हा देशाच्या प्रतिष्ठेवर कलंक आहे. कुत्र्यांना रस्त्यावर सोडण्याचा आदेश देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आता याची जबाबदारी घेतील का? देशाची बदनामी होत आहे, जबाबदार कोण?".
दिल्ली के जेएलएन स्टेडियम में अंतर्राष्ट्रीय पैरा एथलेटिक्स के दौरान जापान और केन्या के कोचों को आवारा कुत्तों ने काट लिया।
— Vijay Goel (@VijayGoelBJP) October 4, 2025
यह देश की साख पर धब्बा है।
क्या सुप्रीम कोर्ट के जज, जिन्होंने कुत्तों को सड़कों पर खुला छोड़ने का आदेश दिया था, अब इसकी जिम्मेदारी लेंगे?
देश बदनाम हो… pic.twitter.com/R8wQlaPKg8
प्रशासकीय अनास्था उघड, आता धावपळ सुरू
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेदरम्यान अशी घटना घडल्याने भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर क्रीडा मंत्रालय, दिल्ली सरकार आणि महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नवी दिल्ली महानगरपालिका (NDMC) आणि दिल्ली महानगरपालिकेने (MCD) स्टेडियम आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून भटकी कुत्री पकडण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे.
विशेष पथके तैनात: स्टेडियम परिसरात श्वान पकडणारी चार कायमस्वरूपी पथके, एक रॅपिड रिस्पॉन्स युनिट आणि विशेष वाहने तैनात करण्यात आली आहेत.
रात्रीपासून कारवाई: घटनेच्या रात्रीपासूनच एका विशेष पथकाने कारवाई सुरू करून स्टेडियमच्या आतील सर्व कुत्र्यांना बाहेर काढले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आणि सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.