स्टिंगने ‘आप’ला हादरा
By Admin | Updated: March 13, 2015 23:14 IST2015-03-13T23:14:53+5:302015-03-13T23:14:53+5:30
आम आदमी पार्टीतील (आप) कलह दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. आता या पक्षातील अल्पसंख्याक सेलने बंडाळीचा झेंडा फडकवला आहे.

स्टिंगने ‘आप’ला हादरा
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) कलह दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. आता या पक्षातील अल्पसंख्याक सेलने बंडाळीचा झेंडा फडकवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोदी लाट रोखण्यासाठी मुस्लिमांना आपशिवाय पर्याय नसल्याचे सांगून पक्षातील इच्छुक मुस्लिम उमेदवारांना तिकीट नाकारल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे.
आपचे माजी नेते व अल्पसंख्यक सेलचे सरचिटणीस शाहिद आझाद यांनी शुक्रवारी जारी केलेल्या आॅडिओ स्टिंगने खळबळ उडाली आहे. ९० सेकंदांच्या या आॅडिओ टेपमध्ये केजरीवाल व पक्षाचे आणखी एक नेते इरफानुल्लाह खान यांच्यातील संभाषण आहे. या संभाषणात मुस्लिमबहुल भागात मुस्लिमांना तिकीट दिल्यास मतांचे विभाजन होईल आणि याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. शिवाय मुस्लिमांकडे तसेही मोदी लाट रोखण्याकरिता आपशिवाय पर्याय नाही, असे केजरीवाल सांगत आहेत.
हे वक्तव्य नेमके केव्हाचे आहे हे मात्र या टेपवरून स्पष्ट होत नाही. केजरीवाल समाजात मुखवटा घालून वावरतात. मुळात त्यांचा खरा चेहरा वेगळाच आहे, असाही आझाद यांचा आरोप आहे. यापूर्वीच्या दिल्ली निवडणुकीत आप सरकारला समर्थन देण्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव मनीष सिसोदिया व संजयसिंग यांनी दोनदा दिला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहंमद खान यांनी गुरुवारी केला होता.