मुंबई : सध्याची कोरोनाची साथ व त्यामुळे लागू झालेले विविध प्रकारचे निर्बंध यामुळे कामाची प्रचलित व्यवस्था पार विस्कळीत झालेली असल्याने कर्मचाऱ्यांना केवळ घरूनच नव्हे तर कुठूनही आॅफिसचे काम करता येईल, अशी यंत्रणा भारतीय स्टेट बँक लवकरच उभी करणार असून, त्यामुळे व्यवस्थापकीय खर्चात वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे.बँकेच्या भागधारकांच्या मंगळवारी येथे व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, खर्चात कपात करणे, कामाचे सुसूत्रीकरण करणे, कर्मचाºयांना नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे, त्यांची उत्पादकता वाढविणे व प्रशासकीय कामातील कर्मचारी कमी करून त्यांचा व्यवसायवाढीसाठी उपयोग करणे, यावर भविष्यकाळात बँकेचा विशेष भर राहील.या नव्या व्यवस्थेने खर्चात १० हजार कोटी रुपयांची बचत होईल व खडतर कोविडोत्तर काळात धंद्यात घट्ट पाय रोवून टिकून राहण्याची तीच मुख्य गुरुकिल्ली ठरेल, असा विश्वासही बँकेच्या अध्यक्षांंनी व्यक्त केला. ते म्हणाले की, कोविडमुळे नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्याच्या चांगल्या स्थितीत बँक आहे व सध्याच्या अडचणीच्या कालखंडातून बँक लवकरात लवकर बाहेर पडेल.- याच धोरणाचा भाग म्हणून जगातील ट्रेंड लक्षात घेऊन कर्मचाºयांना काम कुठूनही करता यावे यासाठी आवश्यक असलेली तंत्रशास्त्रीय यंत्रणा उभारली जाईल. मात्र, हे करीत असताना कर्मचाºयाचे आॅफिसचे काम व त्याचे सामाजिक आयुष्य यात योग्य संतुलन राखण्याचीही काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
स्टेट बँक कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्याची सोय; तंत्रज्ञानावर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 02:21 IST