तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 06:07 IST2025-09-28T06:04:28+5:302025-09-28T06:07:34+5:30
मृतांमध्ये ८ लहान मुले आणि १६ महिलांचा समावेश, ४५ जण जखमी; चौकशीचे आदेश

तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
करूर : अभिनेता व तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील सभेत शनिवारी चेंगराचेंगरी होऊन किमान ३६ लोकांचा मृत्यू झाला तर ४५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ८ लहान मुले आणि १६ महिलांचा समावेश आहे. सभा सुरू असताना, अनेक लोक अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने करूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, तसेच खासगी रुग्णालयांत नेण्यात आले. या दुर्घटनेचे वृत्त कळताच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घटनास्थळी भेट दिली.
शाह-स्टॅलिन चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. शाह यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. गृह मंत्रालयाने तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
एकीकडे विजयचे भाषण सुरू, दुसरीकडे अनेक जण बेशुद्ध
करूर येथे विजय यांच्या प्रचारसभेला प्रचंड गर्दी झाली होती. सभेसाठी हजारो समर्थक सकाळपासूनच रांगेत उभे होते. उन्हाच्या झळांनी व प्रचंड गर्दीमुळे अनेकांचा तगमग वाढत गेली. विजय भाषण करत असतानाच गर्दीत अनेक जण बेशुद्ध पडू लागले. किमान ३० जणांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. विजयने स्वतः भाषण थांबवून अँब्युलन्ससाठी मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वतः पाण्याच्या बाटल्या गर्दीत फेकून मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही काळानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने समेत चेंगराचेंगरी झाली.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक
करूर जिल्ह्यातील चेंगराचेंगरीची घटना अत्यंत वेदनादायक आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत पीडित कुटुंबीयांना धीर दिला आहे.