IPS संदीप चौधरींनी मन जिंकलं; 90 वर्षांच्या वृद्ध हॉकरला आपल्या खिशातून दिले 1 लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 14:39 IST2021-11-15T14:37:31+5:302021-11-15T14:39:47+5:30
खाकीची भीती नेहमीच लोकांच्या मानात असते. पण, या खाकीमागेही एक माणूसच असतो आणि त्यालाही मन असते. अशाच एका आयपीएस अधिकाऱ्याने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.

IPS संदीप चौधरींनी मन जिंकलं; 90 वर्षांच्या वृद्ध हॉकरला आपल्या खिशातून दिले 1 लाख रुपये!
श्रीनगर - खाकीची भीती नेहमीच लोकांच्या मानात असते. पण, या खाकीमागेही एक माणूसच असतो आणि त्यालाही मन असते. अशाच एका आयपीएस अधिकाऱ्याने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. श्रीनगरमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका वृद्ध व्यक्तीला मदतीचा हात दिला. या वृद्ध हॉकरने आपल्या अंत्यविधीसाठी एक-एक पैसा जोडून ठेवला होता. मात्र, त्यांची ही आयुष्याची कमाई काही चोरट्यांनी लुटून नेली.
श्रीनगरचे एसएसपी संदीप चौधरी यांनी त्यांच्या वैयक्तिक बचतीतून या 90 वर्षांच्या हॉकरला 1 लाख रुपये दिले आहेत. जुन्या श्रीनगरच्या बोहरी कदल भागात रस्त्याच्या कडेला हरभरे विकणाऱ्या अब्दुल रहमान यांना मदत करण्याच्या एसएसपींच्या या निर्णयाचे लोक प्रचंड कौतुक करत आहेत.
एसएसपी करतायत तपास -
काही चोरट्यांनी शिनिवारी अब्दुल रहमान यांना बेदम मारहाण केली आणि त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमवलेले एक लाख रुपये पळवले. यासंदर्भात बोलताना एसएसपी संदीप म्हणाले, पैसा आणि इतर गोष्टींपेक्षाही माणुसकी महत्वाची आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ते स्वतःच या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. यानंतर, संदीप चौधरी यांचे सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक होत आहे. यापूर्वीही ते अशाच घटनांमुळे चर्चेत आले आहेत.
उपनिरीक्षक पदासाठी निवड -
काही वर्षांपूर्वी त्यांनी गरजू विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी मदत केली होती. त्यांना याचे फळही मिळाले. त्यांच्या प्रयत्नांमुळे 38 विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्य पोलिसांच्या विविध शाखांमध्ये उपनिरीक्षक पदासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.